
मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने भारतीय बाजारात आपली नवी मिड-रेंज स्मार्टफोन सिरीज रियलमी नार्झो 90 Series लाँच केली आहे. या सिरीजमध्ये रियलमी नार्झो 90 5G आणि रियलमी नार्झो 90x 5G असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले असून, दमदार बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि 5G कनेक्टिव्हिटी ही या सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
डिझाइन आणि डिस्प्लेबाबत बोलायचे झाल्यास, रियलमी नार्झो 90 5G मध्ये 6.57 इंचांची AMOLED फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली असून ती 120Hz रिफ्रेश रेट आणि 1400 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. तर नार्झो 90x 5G मध्ये 6.80 इंचांची LCD डिस्प्ले असून, त्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 15 आधारित Realme UI 6.0 वर चालतात.
परफॉर्मन्ससाठी रियलमी नार्झो 90 5G मध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6400 Max प्रोसेसर देण्यात आला आहे, तर नार्झो 90x 5G मध्ये डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजचा पर्याय उपलब्ध आहे.
कॅमेरा विभागात नार्झो 90 5G मध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. नार्झो 90x 5G मध्ये 50 मेगापिक्सेल Sony IMX852 सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी Narzo 90 5G मध्ये 50 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून, नार्झो 90x 5G मध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
या सिरीजमधील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे बॅटरी. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 7000mAh क्षमतेची Titan बॅटरी देण्यात आली असून ती 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सुरक्षिततेसाठी रियलमी नार्झो 90 5G ला IP66, IP68 आणि IP69 रेटिंग देण्यात आली आहे, तर नार्झो 90x 5G IP65 रेटिंगसह येतो.
किंमत आणि उपलब्धतेबाबत सांगायचे झाल्यास, रियलमी नार्झो 90 5G ची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये असून, या किमतीत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. याच फोनचा 8GB रॅम व्हेरिएंट 18,499 रुपयांना उपलब्ध होईल. तर रियलमी नार्झो 90x 5G चा बेस व्हेरिएंट 13,999 रुपयांना आणि टॉप व्हेरिएंट 15,499 रुपयांना विक्रीसाठी येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 24 डिसेंबरपासून Amazon आणि रियलमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
