बंगळूर, 19 सप्टेंबर, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक एथर एनर्जीने देशभरात 500 एक्सपिरीयन्स सेंटर्स (ईसी) सुरू करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. अवघ्या तीन महिन्यांत म्हणजेच जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान कंपनीने तब्बल 101 नवे सेंटर्स सुरू केले असून त्यापैकी 58 सेंटर्स मध्य आणि उत्तर भारतात उघडली आहेत. ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा, मध्य प्रदेशातील मंदसौर आणि जबलपूर, ओडिशातील सुंदरगड, गुजरातमधील वडोदरा आणि छत्तीसगडमधील बिलासपूरसह अनेक महत्त्वाच्या शहरांत नवे अनुभव केंद्र सुरू करण्यात आले.
एथर एनर्जी लिमिटेडचे चीफ बिझनेस ऑफिसर रवनीत फोकेला यांनी या यशाबद्दल सांगितले की, “500 एक्सपिरीयन्स सेंटर्सचा टप्पा पार करणे हा आमच्या विकास प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. रिझ्टा स्कूटरच्या यशामुळे विशेषतः मध्य आणि उत्तर भारतातील विस्तार वेगाने झाला असून, या व्यतिरिक्त, कालिकत, इंदूर, नाशिक, कोईम्बतूर, गुंटूर, हलद्वानी, सातारा, कोटा, काँगडा आणि एझॉल यांसारख्या टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये देखील एथर आपले हातपाय पसरत आहे. आमचे ध्येय जास्तीत जास्त भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे असून FY26 च्या अखेरीस 700 पेक्षा जास्त एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू ही राज्ये एथरच्या सर्वात मोठ्या बाजारपेठा आहेत, जिथे प्रत्येकी 50 हून अधिक अनुभव केंद्रे कार्यरत आहेत. शहरांच्या दृष्टीने पाहता बंगळूरात सर्वाधिक 18 सेंटर्स असून पुणे आणि हैदराबादमध्ये 13-13, दिल्लीमध्ये 9 तर मुंबई आणि चेन्नईत 8-8 सेंटर्स कार्यरत आहेत. या दमदार रिटेल विस्ताराच्या जोरावर एथरचा राष्ट्रीय मार्केट शेअर FY26 च्या पहिल्या तिमाहीत 14.3% वर पोहोचला, जो FY26 च्या पहिल्या तिमाहीत 7.6% होता. मध्य भारतात झपाट्याने झालेल्या रिटेल विस्तारामुळे एथरचा मार्केट शेअर मागील वर्षाच्या तुलनेत 2.6 पटींनी वाढून 10.7% वर पोहोचला. एथरने FY25 च्या पहिल्या तिमाहीत 22.8% मार्केट शेअर नोंदवून दक्षिण भारतातील आघाडी कायम राखली आहे.
एथरच्या वर्तमान उत्पादन पोर्टफोलियोमध्ये 450 सिरिज आहे, ज्यामध्ये परफॉर्मन्सवर भर दिला आहे, तर दुसरीकडे रिझ्टा ही एथरची पहिली फॅमिली स्कूटर आहे, ज्यात सुरक्षा, आरामदायकता आणि सोयिस्करपणा यावर भर दिला आहे. एथर कम्युनिटी डे 2025 च्या प्रसंगी, एथरने आपल्या संपूर्ण नवीन EL प्लॅटफॉर्मचे अनावरण केले, जो एथर स्कूटर्सच्या पुढच्या पिढीला सक्षम करेल, व्हॉईस-सक्षम इंटरॅक्शन असलेले AtherStack™ 7.0 तसेच पॉटहोल आणि क्रॅश अलर्ट्स सारखी सुरक्षा फीचर्स दाखल केली, 2025 एथर 450 अॅपेक्ससाठी इन्फाइनाईट क्रूझ™ लॉन्च केले आणि रिझ्टा Z साठी टचस्क्रीनची सुविधा देऊन मोठ्या अपग्रेडची घोषणा केली.
सध्या होसूर, तामिळनाडू येथे एथरचे 2 उत्पादन कारखाने आहेत. ज्यापैकी एका कारखान्यात वाहनाची असेंब्ली होते, तर दुसऱ्यात बॅटरीचे उत्पादन होते. बिडकिन, AURIC, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे त्यांचा तिसरा उत्पादन कारखाना सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील या आगामी सुविधेमुळे सर्व सुविधांची मिळून एथरची एकूण उत्पादन क्षमता वाढून दर साल 1.42 मिलियन इलेक्ट्रिक दुचाकी इतकी होईल अशी अपेक्षा आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
