cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Article > सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!
Article

सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!

CliQ INDIA
Last updated: April 13, 2026 6:36 am
CliQ INDIA
Share
9 Min Read
SHARE
सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे..!

आशा हे केवळ दोन अक्षरी नाव नसून मानवी अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे. कठीण प्रसंगात निराशेच्या गर्दीत आशेचा एक किरण माणसाला नव्याने जगण्याची प्रेरणा देतो. ‘आशा’ हे मानवी मनाचे असे एक विलक्षण रसायन आहे, जे काळ्याकुट्ट रात्रीतही पहाटेची स्वप्ने पाहण्यास भाग पाडते. संगीताच्या जगतात देखील शब्द, ताल आणि स्वरांवरील हुकूमतीने मानवी रूप धारण करताना ‘आशा’ हेच नाव स्वीकारले होते. गेली 82 वर्षे आपल्या स्वर्धुनींनी संगीत रसिकांवर गारूड करणाऱ्या आशा भोसलेंनी इहलोकाचा निरोप घेतला आणि चैत्राकडून वैशाखाकडे मार्गक्रमण करणाऱ्या ऋतुचक्रात झालेली स्वरांची ही भैरवी रसिकांनच्या मनाला होरपळून गेली.

संगीताच्या क्षेत्रात अल्पावधीत देदिप्यमान कर्तृत्व गाजवणाऱ्या मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या पंचरत्नांपैकी आणखी एक रत्न काळाच्या पडद्याआड गेले. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची धाकटी बहिण म्हणून वयाच्या दहाव्या वर्षी संगीताचा श्रीगणेशा करणाऱ्या आशा भोसले यांनी तब्बल 20 भाषांमध्ये 12 हजार गाणी गायली. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप, कॅबरे आणि गझलांद्वारे आपल्या अष्टपैलु स्वरांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 82 वर्षे संगीत रसिकांची सेवा केली. जीवन प्रवासात गाणे सोबत घेऊन भटकणाऱ्या वेड्या जीवांसाठी आशाताईंची गाणी ही वाळवंटातील प्याऊच म्हणावी लागतील. मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या या विलक्षण कन्येचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजीचा. आशाताई अवघ्या 9 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे 1942 साली निधन झाले. वडिलांच्या सावलीत उमजेली संगीताची जाण आणि गळ्यात असलेला जन्मजात स्वर या दोनच गोष्टी वडिलांच्या पश्चात आशाताईंकडे होत्या. वडिलांच्या अवेळी आणि अकस्मात जाण्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या बहिणीच्या खांद्याला खांदा लावून आशा भोसले देखील संगीताच्या प्रवासाला निघाल्या. ज्या काळात संगीत ही साधना मानली जात होते त्या काळी त्यांना उपासनेला कौटुंबिक जबाबदारीच्या पूर्ततेसाठी पेशा बनवावे लागले.

 

आशाताईंना 1943 मध्ये ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातून गायन प्रवास सुरू केला आणि 1948 मध्ये ‘चुनरिया’ चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. चित्रपट संगीताच्या प्रवासात आशा भोसलेंनी गायलेली ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आ जा’, ‘दिल चीज क्या है’, ‘मेरा कुछ सामान’ यांसारख्या शेकडो गाण्यांनी त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले किंबहुना गाजवत आहेत. परंतु, लहानपणापासून बिनधास्तपणाचा कंगोरा लाभलेल्या आशातांईंच्या गाण्यातील मस्ती त्यांच्या जगण्यात देखील दिसायची. यातूनच मंगेशकर कुटुंबियांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आशाताईंनी कुटुंबियांच्या इच्छेविरूद्ध गणपतराव भोसलेंशी लग्न केले. परंतु, कुटुंबियांच्या अनिच्छेने केलेल्या गोष्टींचे जे होते तेच आशताईंच्या बाबतीच देखील घडले आणि त्यांचा मनस्वी विवाह अपयशी ठरला. परंतु, त्या अपयशी विवाहामुळे मंगेशकरांच्या या कन्येला मिळालेले भोसले हे उपनाम शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिले. नंतरच्या काळात त्यांनी संगीतकार आर.डी. बर्मन यांच्याशी लग्न केले होते.

आशा भोसलेंच्या वैयक्तीक आयुष्यातील घडामोडी आणि संगीताचा प्रवास नदीच्या दोन किनाऱ्यांप्रमाणे कायम राहिले पण कधी एकमेकांच्या मार्गात आडवे आले नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळात घरोघरी दिसणारे रेडिओ आणि त्यामाध्यमातून प्रत्येक कुटुंबात झालेल्या आशा भोसलेंच्या स्वरांचा शिरकाव 5 पिढ्यांपासून तसाच कायम आहे. “केव्हां तरी पहाटे उलटून रात्र गेली” या सुरेश भटांच्या शब्दांना आशाताईंनी आपल्या आवाजाने अजरामर केले. त्यांच्या “अशीच अवचित भेटून जा” या गीतातील हळुवारपणे रसिकांना आजही भुरळ घालतो. तर निसर्ग आणि मनाच्या नात्याची गुंफण अभिव्यकत करणारे “येरे घना” हे गीत अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यासोबतच “मलमली तारुण माझे” या गीतातील शृंगारिक भाव रसिकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. रात्रीच्या निरव शांततेत “चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले” या गाण्याची मोहिनी पडली नाही असा रसिक मिळणे कठीण आहे. आशा भोसलेंच्या स्वरांनी नटलेली गीते कानातून मनात रेंगाळत असतानाच त्यांचा “कानडा राजी पंढरीचा” या भक्तीगीताविना पंढरपूरची आषाढ किंवा कार्तिक वारी अपूर्ण राहते असे म्हंटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. तसेच “अजि मी ब्रह्म पाहिले” आध्यात्मिक ओढ असलेल्या गीताने वेगळीच उंची गाठली आहे. यासोबतच आशाताईंच्या ‘येगं येगं विठाबाई’ ही विठ्ठलाची आळवणी काळजाचा ठाव घेते तर “उठी उठी गोपाळा” या प्रभात गीताने अजूनही अनेकांच्या दिवसाची सुरूवात होते. भाव आणि भक्ती गीतांसोबतच आशाताईंची चित्रपट गीते देखील प्रचंड गाजलीत. “गोमू संगतीनं माझ्या तू येशील का” तसेच “रुपेरी वाळूत माडांच्या बनात’, “धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना” ही अप्रतिम गीतं गळ्यात गाणे नसणाऱ्यांना देखील गुणगुणण्यास भाग पाडतात. तसेच “एका तळ्यात होती बदके पिले सुरेख” हे गीत आत्मशोधातून आत्मोन्नतीचा प्रवास अतिशय सहजपणे उलगडून जाते. ग्रामीण संस्कृतीचा सुंगंध असलेला “जांभूळ पिकल्या झाडाखाली” या गीतांतून आजही ऐकणाऱ्याला मृदगंध जाणवतो. “तुम्ही माझे बाजीराव” या लावणीतील आशाताईंनी उच्चारलेल्या “बाजीराव” आणि “मज्जाव” या शब्दांच्या पुनरोक्तीसाठी गायकांना रियाज करावा लागतो. तर “दिस जातील दिस येतील” या गातातून विरह आणि आशा या दोन्हींचे दर्शन होते.

भावगीते, भक्तीगीते, लावणी, शृगांरिक रचना, अभंग आणि गझलांची लोकप्रियता आशाताईंना मराठी कुटुंबांमधील प्रत्येक वयोगटातील रसिकांशी एकरूप करीत असतानाच खंडप्राय विस्तीर्ण पसरलेल्या देशात इतर भाषांमधील रसिकांवर आशा भोसलेंचे स्वर हिंदी चित्रपट गीतांच्या माध्यमातून श्रावण सरींचा वर्षाव करीत होता. आशा भोसलेंच्या आवाजातील मादकता आणि नजाकत याचा सुरेख आणि सुरेल मिलाफ असलेले हवाडा ब्रिज चित्रपटातील “आईये मेहरबान” या गीतात रसिक श्रोत्यांना आजही खिळवून ठेवण्याची ताकत आहे. तर त्यांच्या किस्मत चित्रपटातील “आओ हुजूर तुमको सितारो मे ले चलू” या गीताचा तजेलदारपणा अजूनही कायम आहे. त्याचप्रमाणे मेरे सनम चित्रपटातील “ये है रेशमी जुल्फो का अंधेरा ना घबराईये” आणि “जाईये आप कहां जायेंगे” ही गीते अजूनही मैफलींची शोभा वाढवतात. सोलो चित्रपट गीतांमधून आशाताईंची लोकप्रियता वाढत असतानाच युगुल गीतांमध्ये देखील त्यांचे वेगळेपण अलबत अधोरेखित होते. नया दौर चित्रपटातील “उडे जब जब जुल्फे तेरी” किंवा “मांग के साथ तुम्हारा” या गीतांनी देशभरातील संगीतप्रेमींपुढे आशा भोसले नामक दैवत उभे केले. काश्मीर की कली सिनेमातील “ईशारो ईशारो मे दिल लेने वाले” आणि “दिवाना हुवा बादल” या गीतांनी त्याकाळी लोकप्रियतेची शिखरे गाठली होती. पुरुष गायकांसोबत गातानाच किस्मत चित्रपटात आशाताईंनी पहाडी आवाजाच्या शमशात बेगम सोबत गायलेले “कजरा मोहब्बत वाला” आणि चौदवी का चांद मधील “शरमा के ये सब पर्दानशी क्यो आंचल को सवांरा करते है” ही गाणी देखील फार लोकप्रिय ठरलीत. आशा भोसले आणि ओ. पी. नय्यर यांच्या या सुवर्ण काळातील गाण्यांचा आनंद घेण्यासाठी पंचमदांनी आशाताईंच्या आवाजातील ‘पॉप’ आणि ‘मॉडर्न’ छटा जगासमोर आणल्या. ही जोडी संगीत आणि वैयक्तिक आयुष्यातही एकमेकांची सोबती होती. त्यांच्या हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील “दम मारो दम” या गीताशिवाय अजूनही होळीच्या उत्सवाची पूर्तता होत नाही. कारवाँ सिनेमातील “पिया तू अब तो आजा” या गीतात “मोनिका… ओ माय डार्लिंग..!” हे शब्द आणि आशाताईंनी श्वास रोखून धरलेला आवाज अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे. यासोबतच यादो की बारात चित्रपटातील “चुरा लिया है तुमने जो दिल को” हे रोमँटिक सॉन्ग आणि तिसरी मंझिलमधील “ओ हसीना जुल्मो वाली” ही हाय-एनर्जी गाणे आजही डान्स फ्लोअरवर प्रचंड लोकप्रिय आहेत. एकीकडे स्वरांची बेफाम उधळण सुरू असतानाच आशाताईंनी इजाजत चित्रपटासाठी गुलजार यांनी लिहीलेले “मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है” यातील सखोलता आपल्या अशी काही मांडली की, थेट राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या झोळीत येऊन पडला होता.

ज्येष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन यांनी आशाताईंच्या आवाजातील साधेपणा आणि गोडव्याचा उत्तमरीत्या वापर करून घेतला होता. एसडी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या बंदिनी चित्रपटातील “अब के बरस भेट भैय्या को बाबू” या विरह गीतामुळे त्याकाळी श्रोत्यांचे डोळे पाणावून पाणावून जायचे. ज्वेल थीममधील “रात अकेली है” आणि शर्मिली चित्रपटाच्या “रेशमी उजाला है” ही गाणी रसिकांना भुरळ घालतात. तर बंबई का बाबू सिनेमातील “दिवाना मस्ताना हुवा दिल जाने कहाँ हो के बहार आई” हे गीत अजूनही अनेकांच्या मोबाईलमध्ये वाजत असते. संगीताच्या प्रवासात आशाताईंनी कधी कुठल्या गोष्टीचे वावडे मानले नाही. अमुकच एका पद्धतीची गाणी म्हणायची किंवा विशिष्ट संगीतकार आणि गायकांसोबतच गायचे असा त्यांचा हेका कधीच नव्हता. त्यांनी आपली मोठी बहिण लता मंगेशकर यांच्यासोबत उत्सव चित्रपटात “मन क्यो बहका रे बहका” हे द्वंद गीत म्हंटले होते. तर संगीताचे धडे गिरवणाऱ्यांना त्यांच्या गुरूंकडून उमराव जान चित्रपटातील आशा भोसलेंचे “इन आँखो कि मस्ती के मस्ताने हजारो है” हे गीत ऐकण्याची सूचना आवर्जून करतता. संगीतकार खय्याम आणि आशाताई यांच्या गझलने इतिहास घडवला आहे.

या सुरेल, सुरेख आणि अप्रतिम संगीतप्रवासासाठी आशा भोसलेंना दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या गायिका म्हणून 2011 मध्ये आशा भोसलेंची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अफाट संघर्ष, जिद्द आणि सांगीतावरील निस्सीम प्रेम या गोष्टी एकत्र आल्या की त्याची आशा भोसले होते. संगीतातील सप्त स्वर, भावनेचे नऊ रसांचा गळ्यात संगम असलेल्या आशा भोसलेंनी इहलोकाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या स्वर संगमात आकंठ बुडालेले रसिक “हे सरता संपत नाही, चांदणे तुझे स्मरणाचे” म्हणत आशाताईं आणि त्यांच्या स्वरांना चिरंजीव ठेवतील यात शंका नाही.

 

– मनीष कुलकर्णी

 

You Might Also Like

'सारथी'कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण
संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य
आरसेटी संस्थेतून महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण
श्रीरामनवमीचे महत्त्व – Hindusthan Samachar Marathi
अष्टावधान कला – एकाग्रतेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article आशाताईंची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील – पंतप्रधान
Next Article बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप : अंतिम सामन्यात आयुष शेट्टी शी युकीकडून पराभूत
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?