मुंबई, 17 फेब्रुवारी (हिं.स.)।बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान यांचे वडील आणि इंडस्ट्रीतील दिग्गज पटकथा लेखक सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली असून त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
वडिलांच्या प्रकृतीबाबत समजताच सलमान खान तात्काळ रुग्णालयात पोहोचले. हॉस्पिटलमधून त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात ते खूप चिंताग्रस्त दिसत आहेत.यानंतर चाहत्यांमध्ये सलीम खान यांच्या आरोग्याबद्दल अधिक चिंता व्यक्त केली जात आहे. सलमान खान यांच्या भोवती कडक सुरक्षा व्यवस्थाही दिसून आली. सलमान खान यांच्यानंतर बहीण अलवीरा खान आणि तिचे पती अतुल अग्निहोत्री हे देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचले. दोघेही उदास दिसत होते; अलवीरा खान घाईघाईत कारमधून उतरून रुग्णालयात जाताना दिसली.
सलीम खान यांची गणना बॉलिवूडमधील दिग्गज लेखकांमध्ये होते. जावेद अख्तर यांच्यासोबत ‘सलीम–जावेद’ या जोडीने अनेक
चित्रपट दिले. त्यामध्ये शोले, दीवार, डॉन, जंजीर, त्रिशूल आणि सीता और गीता यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सलीम खान यांनी यापूर्वी अभिनेता म्हणूनही काही चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सलमान खान यांच्याशिवाय सलीम खान यांना आणखी तीन मुले आहेत — अरबाज खान, सोहेल खान आणि अलवीरा खान. याशिवाय त्यांनी अर्पिता खान हिला दत्तक घेतले आहे. सलीम खान यांनी प्रथम सलमा खान यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर दिग्गज अभिनेत्री हेलन यांच्याशी १९८१ साली दुसरे लग्न केले.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
