रायगड, 01 जानेवारी (हिं.स.)।
रोहा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे दमखाडी, त्रिमुर्तीनगर येथे अज्ञात चोरट्यांनी स्नॅक्स दुकान फोडून रोख रक्कम व मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० या कालावधीत घडली.
दमखाडी, ता. रोहा येथील अग्रवाल स्नॅक्स कॉर्नर या दुकानाचे लोखंडी शटरला लावलेले कुलूप अज्ञात चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने तोडले. त्यानंतर दुकानात प्रवेश करून चोरट्याने रोख रक्कम, सिगारेटची पाकिटे तसेच एक मोबाईल असा एकूण ६४ हजार ८७० रुपये किमतीचा माल लबाडीच्या हेतूने चोरी करून नेला. हा प्रकार दुकानमालकाच्या संमतीशिवाय करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी फिर्यादीने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यानुसार रोहा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३३४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ) व ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, तसेच स्थानिकांकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुर्यकांत पवार हे करीत आहेत.
सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके
