पुणे, २८ जानेवारी : पुण्यात विवाहाच्या आमिषाने मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सोलापुरातील एका तरुणाविरुद्ध विनानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुण माजी आमदार रविकांत पाटील यांचा मुलगा विराज असल्याची माहिती समोर येत आहे. तक्रारीत आरोपीने डोक्याला पिस्तुल लावून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
पीडित तरुणीने (३२) विमाननगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली होती. त्यावरून विराज रविकांत पाटील (३५, रा. रॉयल पाल्म, सोरेगाव, सोलापूर) याच्याविरुद्ध भादंवि 376, 376(2)(एन), 377, 323, 504, 506 सह शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सगळा प्रकार २७ ऑगस्ट २०२३ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत विमाननगर व मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटात काम केले आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सोशल मीडियातून तिची विराज पाटीलशी ओळख झाली होती. दोघे एकमेकांच्या संपर्कात आले. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन विवाह करणार असल्याचे आमिष विराजने अभिनेत्रीला दिले होते. मात्र त्यानंतर त्याने लग्नाबाबत विचारले असता तरुणीला धमकावले. त्यानंतर आरोपीने पीडित तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपी पीडित तरुणीला टाळू लागला. त्यामुळे फिर्यादी तरुणीने विराजकडे विचारणा केली. मला घरच्यांना का भेटवत नाही, अशी विचारणाही केली होती. त्यावर विराजने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर जवळ असलेली पिस्तुल तरुणीच्या डोक्याला लावून मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही, तू जर पोलिसांकडे गेली तर तुला दाखवतो मी कोण आहे, अशी धमकीही दिल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपी विराज पाटील याची राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांचा विराज हा पुत्र आहे. पाटील हे कर्नाटकमधील इंडी मतदार संघाचे माजी आमदार आहेत. तसेच सोलापूरातून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली होती.
