२१ सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून
पाळला जातो. युद्ध, दहशतवाद, अराजकता,
धार्मिक
उन्माद,
राजकीय
संघर्ष आणि सामाजिक विषमता यांनी ग्रासलेल्या जगात हा दिवस मानवतेसाठी एका नव्या
शपथेचा दिवस ठरतो. जागतिक शांततेची संकल्पना ही केवळ एक आदर्श कल्पना नसून
मानवजातीच्या अस्तित्वाशी निगडित अशी मूलभूत गरज आहे. शांतीशिवाय समाजाचा विकास,
विज्ञान-तंत्रज्ञानाची
प्रगती,
संस्कृतीचे
संवर्धन किंवा मानवी मूल्यांचे पोषण कधीही शक्य होत नाही. म्हणूनच आंतरराष्ट्रीय
शांतता दिन ही केवळ एका तारखेशी जोडलेली औपचारिकता नसून, मानवी
जीवनाच्या सर्व अंगांना दिशा देणारी आणि नव्या भविष्याचा मार्ग दाखवणारी वैश्विक
संकल्पना आहे.
जगाच्या इतिहासाकडे पाहिले असता, युद्धे
आणि संघर्षांनी मानवतेला केवळ उद्ध्वस्त केले आहे. प्राचीन काळापासून आधुनिक
काळापर्यंत झालेली लढाई, धार्मिक युद्धे,
साम्राज्य
विस्ताराच्या हव्यासापोटी झालेला विध्वंस, औपनिवेशिक
आक्रमणे,
दोन
महायुद्धांचे भयावह दृष्य, शीतयुद्धातील तणाव
आणि आजच्या काळातील दहशतवाद, अण्वस्त्र स्पर्धा,
सायबर
युद्धे यांमुळे जगाच्या प्रगतीला कित्येकदा अडथळा निर्माण झाला आहे. मानवी रक्ताचा
हा महासागर कधी संपणार, असा प्रश्न प्रत्येक
मानवांच्या मनात उमटतो आहे. या पार्श्वभूमीवर शांतीची संकल्पना ही जगाच्या
टिकावासाठी सर्वोच्च मूल्य ठरते.
संयुक्त राष्ट्रसंघाने १९८१ साली २१ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय
शांतता दिन म्हणून घोषित केला. सुरुवातीला हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या
अधिवेशनाच्या प्रारंभ दिनाशी जोडला गेला होता. परंतु नंतर ठराविक तारखेला जगभरात
हा दिवस साजरा करण्याचे ठरविण्यात आले. या दिवशी जगभरात एक मिनिट मौन पाळून जागतिक
शांततेचा संदेश दिला जातो. युद्धविरामासाठी प्रार्थना केली जाते. हिंसाचाराच्या
विरोधात आणि संवादाच्या समर्थनार्थ जनजागृती घडवून आणली जाते.
शांततेची संकल्पना ही केवळ युद्धाचा अभाव नसून ती मानवी
जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रकट होते. सामाजिक न्याय, आर्थिक
समानता,
लिंगभेदाचा
अंत,
जातीय
सौहार्द,
धार्मिक
सहिष्णुता,
पर्यावरणाचे
रक्षण,
दारिद्र्य
निर्मूलन,
शिक्षणाचा
प्रसार,
आरोग्याची
हमी,
रोजगारनिर्मिती,
मानवी
हक्कांचे संरक्षण या सर्व बाबी जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या
ठरतात. म्हणूनच आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचा संदेश हा बहुआयामी आहे.
आजच्या जगात दहशतवाद हा जागतिक शांततेपुढील सर्वात मोठा धोका
ठरतो आहे. सीमापार दहशतवाद, धार्मिक अतिरेकीपणा,
सायबर
हल्ले,
मानव
तस्करी,
अंमली
पदार्थांचा व्यापार आणि शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर देवाणघेवाण या सर्व गोष्टी
जागतिक शांततेला धक्का देतात. याचबरोबर दारिद्र्य, बेरोजगारी,
भूक,
निरक्षरता,
जातीय
संघर्ष,
वांशिक
द्वेष,
हवामान
बदल यांमुळेही असंतोष निर्माण होतो आणि समाज अस्थिरतेच्या गर्तेत ढकलला जातो. अशा
परिस्थितीत शांती ही केवळ राजकीय तडजोड किंवा तहापुरती मर्यादित न राहता ती व्यापक
सामाजिक,
सांस्कृतिक
आणि आर्थिक उपक्रमांमधून साकार होणे आवश्यक ठरते.
भारतीय परंपरेत शांततेला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले
आहे. महात्मा गौतम बुद्ध, महावीर,
संत
तुकाराम,
महात्मा
गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनीच मानवतेच्या अस्तित्वासाठी शांततेलाच
सर्वोच्च मूल्य मानले आहे. विशेषतः महात्मा गौतम बुद्ध यांनी दिलेला ‘अहिंसा
आणि शांततेचा’
संदेश जागतिक शांततेसाठी प्रेरणादायी ठरला आहे. म्हणूनच आजच्या जागतिक पातळीवर
भारताची शांततेची परंपरा ही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक ठरते.
शांतता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण हा सर्वांत प्रभावी
मार्ग आहे. मुलांच्या मनात लहानपणापासूनच सहिष्णुता, सामंजस्य,
परस्पर
आदर,
विविधतेचा
सन्मान,
समता,
सामाजिक
जबाबदारी या मूल्यांची रुजवण झाली तर भविष्यातील पिढ्या हिंसाचाराकडे न वळता
शांततेच्या मार्गाने प्रगती करतील. तसेच माध्यमांचा जबाबदार वापर,
सामाजिक
माध्यमातील तटस्थता, संवाद आणि चर्चा यांना प्राधान्य देणे,
सांस्कृतिक
आदान-प्रदान,
क्रीडा
आणि कला यांद्वारे जागतिक एकात्मतेचा विकास करणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते.
आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचा संदेश हा प्रत्येक व्यक्तीच्या
कृतीत प्रतिबिंबित होणे आवश्यक आहे. समाजातील तणाव, कुटुंबातील
कलह,
शेजाऱ्यांशी
वाद,
धार्मिक
व जातीय मतभेद,
राजकीय
असहिष्णुता,
लिंगभेद
अशा असंख्य लहानसहान पातळ्यांवर शांततेचा अभाव दिसून येतो. जर प्रत्येक व्यक्तीने
स्वतःच्या दैनंदिन जीवनात शांततेचे तत्त्व आत्मसात केले तर जागतिक शांततेकडे
जाणारा प्रवास सुलभ होऊ शकतो.
युद्धाच्या छायेत जगणाऱ्या देशांमध्ये शांततेची आस अधिक तीव्र
असते. पॅलेस्टाईन, इस्रायल, युक्रेन,
सीरिया,
अफगाणिस्तान
अशा प्रदेशांत असंख्य निरपराध लोक शांततेसाठी तळमळत आहेत. बालके,
महिला,
वृद्ध
यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांच्या हृदयातील आर्त प्रार्थना म्हणजेच खऱ्या
शांततेची मागणी आहे. अशा वेळी जागतिक नेते, संयुक्त
राष्ट्रसंघ,
प्रादेशिक
संघटना,
स्वयंसेवी
संस्था आणि साधारण नागरिक यांना पुढाकार घ्यावा लागतो. संवाद,
मध्यस्थी,
परस्पर
समजूत,
मानवी
हक्कांचा सन्मान या मार्गांनीच टिकाऊ शांतता प्रस्थापित होऊ शकते.
हवामान बदल आणि पर्यावरणीय संकट हेदेखील जागतिक शांततेसाठी
आव्हान ठरले आहे. जलसंपत्तीवरील ताबा, जंगलतोड,
प्रदूषण,
जैवविविधतेचा
नाश यांमुळे मानवी जीवन धोक्यात आले आहे. पाणी, अन्नधान्य,
उर्जा
यांवरील तुटवड्यामुळे अनेक देशांमध्ये तणाव वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण
हेही जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. हरित तंत्रज्ञान,
नवीकरणीय
उर्जा,
पर्यावरणपूरक
जीवनशैली,
जागतिक
करार यांद्वारे पर्यावरणाचे संरक्षण झाले तरच शाश्वत शांतता प्रस्थापित होईल.
आजच्या युगात तंत्रज्ञानाचे योगदानही शांततेच्या प्रक्रियेत
मोठे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान,
आंतरराष्ट्रीय
संवादव्यवस्था,
जागतिक
नेटवर्क यांद्वारे संवादाची क्षमता प्रचंड वाढली आहे. जर या साधनांचा योग्य वापर
केला गेला तर लोकशाहीचा पाया भक्कम होईल आणि संघर्ष टाळता येतील. पण याच
तंत्रज्ञानाचा वापर दहशतवाद, द्वेषपूर्ण प्रचार,
सायबर
युद्धासाठी केला गेला तर शांततेला धक्का बसू शकतो. म्हणूनच तंत्रज्ञानाचा नैतिक
आणि जबाबदार वापर ही काळाची गरज आहे.
जागतिक शांततेसाठी महिलांचा सहभागही निर्णायक ठरतो. महिलांनी
कुटुंब,
समाज
आणि राष्ट्र उभारणीत दिलेल्या योगदानामुळे शांततेच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका
महत्त्वाची आहे. ‘United Nations Security Council Resolution 1325’ नुसार
महिलांचा शांतता चर्चेत, युद्धविरामाच्या
करारांत,
संघर्षोत्तर
पुनर्बांधणीत सक्रिय सहभाग असावा असे स्पष्टपणे नमूद केले गेले आहे. कारण महिला ही
जीवनाची जननी असून त्यांच्या संवेदनशीलतेमुळे शांततेचे खरे तत्त्वज्ञान आकार घेऊ
शकते.
आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा जागतिक पातळीवर अनेक
कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो. शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी
संघटना,
माध्यमे,
कला
व साहित्य क्षेत्र, धार्मिक संस्था, राजकीय मंच,
आंतरराष्ट्रीय
परिषद,
सांस्कृतिक
आदानप्रदान अशा विविध स्तरांवर शांततेचे संदेश दिले जातात. काव्यलेखन,
चित्रकला,
संगीत,
नाटक,
चित्रपट
या माध्यमांतून शांततेचे स्वर उमटतात. त्यामुळे हा दिवस केवळ औपचारिकतेपुरता न
राहता तो सर्जनशील अभिव्यक्तीद्वारे जनमानसात जिवंत होतो.
शांततेचे खरे स्वरूप म्हणजे मानवी एकात्मता होय.
जात,
धर्म,
भाषा,
प्रांत,
राष्ट्र
या सर्व भिंती ओलांडून जेव्हा मानवतेची जाणीव प्रबळ होते तेव्हाच शांतता फुलते.
म्हणूनच आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा आपल्याला या मूलभूत सत्याची आठवण करून देतो.
मानवतेसाठी एकत्र येणे, संघर्षाऐवजी सहकार्य
करणे,
दारिद्र्याऐवजी
समृद्धीचा मार्ग निवडणे, द्वेषाऐवजी प्रेमाचा
संदेश पसरवणे हेच खरे शांततेचे मूळ आहे.
शेवटी, निष्कर्ष असा की, आंतरराष्ट्रीय
शांतता दिन हा केवळ एक प्रतीकात्मक दिवस नसून मानवी अस्तित्वाचा शाश्वत आधार आहे.
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात परस्परावलंबन वाढले आहे. कोणतेही राष्ट्र
स्वतंत्रपणे सुरक्षित राहू शकत नाही. एका देशातील संघर्षाचा परिणाम संपूर्ण जगावर
होतो. म्हणूनच प्रत्येक राष्ट्र, प्रत्येक समाज आणि
प्रत्येक व्यक्तीने शांततेच्या दिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे. हे पाऊल छोटे असले
तरी त्यातून भविष्यातील मोठा बदल घडू शकतो. ‘जगात जे बदल पाहायचे आहेत ते आधी
स्वतःमध्ये आणा’ हाच मंत्र आजच्या आंतरराष्ट्रीय शांतता दिनाचा आहे.
डॉ. राजेंद्र बगाटे, (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक )
मो. क्र. ९९६०१०३५८२
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
