सोलापूर, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। प्रेयसी असलेल्या नर्तकीला भेटायला आलेल्या लुखामसला (ता. गेवराई) गावच्या माजी उपसरपंचाने सासुरे (ता. बार्शी) येथील तिच्याच घरासमोर कारमध्ये डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भेटायला येऊनही तिने कॉल न उचलल्याने त्याने जीवन संपविले. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय ३४) असे मृताचे नाव आहे. त्याच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकीविरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा कला केंद्रात नेहमी येत होता. सुमारे एक-दीड वर्षापूर्वी कला केंद्रामध्ये सासुरे (ता. बार्शी) परिसरातील एका नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. तेथून ती पारगाव कला केंद्राकडे जाऊ लागली आणि गोविंदची मैत्री वाढली, त्यांच्यात प्रेम झाले. यातून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे बर्गे यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
