
मुंबई, 22 ऑगस्ट (हिं.स.)। ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ येत्या २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ व सायंकाळी ७ वाजता ‘सन मराठी’वर पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्या सुरांच्या मैफिलीत श्रीगजाननाचं
आगमन होणार आहे. गायक राहुल देशपांडे यांचं गाणं आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकतं. त्यांचं गाणं ऐकताच ‘सन मराठी’च्या कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त करत म्हणाले की, गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणं म्हणजे आमचं भाग्य आहे. आम्हा सगळ्यांना जणू साक्षात विठ्ठलाचं दर्शन झालं असं म्हणायला हरकत नाही. यंदाचा हा गणेशोत्सव म्हणजे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. याचसह तरुण पिढीला अभंगाचे वेड लावणारा ‘अभंग रिपोस्ट’ हा ग्रुप देखील नवीन शैलीत अभंग सादर करणार आहेत. मुळात ‘सन मराठी’वर पहिल्यांदा राहुल देशपांडे व अभंग रिपोस्ट यांच्या मैफिलीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.
तसेच गणेशोत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदा ‘सन मराठीचं’ संपूर्ण कुटुंब एकत्र येत जल्लोषात श्रीगणेश आगमन करणार आहेत. प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांचे ठसकेबाज नृत्य , धमाल गाणी , पोटधरून हसवणारे खेळ एकंदरीतच मनोरंजनाचा फुल ऑन पॅकेज पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या मनोरंजनाच्या राईड मध्ये बसायलाच हवं.भक्तीभाव आणि रंगतदार कलात्मकतेचा संगम या सोहळ्यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.
‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ हा सोहोळा म्हणजे परंपरेची गोडी आणि आधुनिकतेची झलक यांचा सुंदर संगम आहे. गणेशभक्तीचा सुरेल अनुभव, तरुणाईकडून अभंगाची आरास आणि कलाकारांच्या धमाल परफॉर्मन्समुळे हा सोहळा प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
