मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.)
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा करार वाढवला आहे. ते जून २०२६ पर्यंत या पदावर आता राहणार आहेत. पण या संदर्भात बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. माजी वेगवान गोलंदाज आगरकर यांना जुलै २०२३ मध्ये टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.
आगरकर यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. याशिवाय टीम इंडिया २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही पोहोचली होती. अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या आधी आगरकर यांचा करार नूतनीकरण करण्यात आला होता. बीसीसीआयने त्यांचा करार जून २०२६ पर्यंत वाढवला होता आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वी ही ऑफर स्वीकारली होती.
सध्या निवड समितीमध्ये आगरकर, एस.एस. दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा आणि एस. शरथ यांचा समावेश आहे. पण सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर वरिष्ठ निवड समितीमध्ये काही बदल दिसून येतील असे मानले जाते. आणि एस. शरथ यांना हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शरथ सप्टेंबर २०२१ मध्ये ज्युनियर निवड समितीचे अध्यक्ष होते आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना वरिष्ठ निवड समितीमध्ये बढती देण्यात आली. बीसीसीआय आता त्यांच्या जागी नवीन चेहरा नियुक्त करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
