सोलापूर, 5 ऑगस्ट, (हिं.स.)। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मतदार आणि उमेदवारांच्यासमोर सर्वांत आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा पेपर येण्याची शक्यता आहे. भाजपसाठी अवघड असलेला हा पेपर अधिक सोपा करण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. ऑगस्टअखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सोलापूरच्या राजकारणात भाजप मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. पक्ष प्रवेशासाठी तयार झालेल्या प्रमुख नेत्यांची बैठक या दहा ते १५ दिवसांमध्ये मुंबईत होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहर व परिसराच्या राजकारणावर विशेष लक्ष ठेवल्याचे दिसते. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या रणनीतीने भाजपला यश मिळाले. काँग्रेसचे नेते माजी आमदार दिलीप माने, जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह अनेक नेते भाजपच्या जवळ आले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थ असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन जिल्हा परिषदेची बेरीज करण्याच्या तयारीत भाजप आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
