बंगळूर, 1 ऑगस्ट (हिं.स.)। सीपीव्हीसी आणि पीव्हीसी पाईप्सचे निर्माते पोद्दार प्लंबिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडने कर्नाटकमध्ये रोजगाराच्या 12,000 संधी निर्माण करण्याचे ठरवले आहे. यासाठी त्यांनी तेथील गुंतवणुकीतही वाढ केली असून आतापर्यंत 492 कोटींवर असलेली गुंतवणूक आता थेट 758 कोटींवर गेली आहे. 33 एकरांवर पसरलेल्या वेमगल औद्योगिक क्षेत्र (फेज 2), कोलार येथे एक प्रमुख सुविधा उभारण्याची कंपनीची योजना आहे. येथे ऑगस्ट 2026 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. तर कंपनीने विजयपुरा येथे दुसरे युनिट प्रस्तावित केले आहे.
पोद्दार प्लंबिंगचे व्यवस्थापकीय संचालक दीपक पोद्दार आणि संचालक वरुण पोद्दार यांनी याची घोषणा केली. खनिजा भवन येथे मोठे तसेच मध्यम उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेमागल औद्योगिक क्षेत्रात (फेज-2) कंपनीला 33 एकर जमीन देण्यात आली आहे. येथील प्लांट ऑगस्ट 2026 पर्यंत कार्यान्वित करण्याच्या दिशेने पोद्दार प्लंबिंग सिस्टम काम करत आहे. या प्रकल्पातून 3,000 प्रत्यक्ष तर 9,000 अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचे बैठकीनंतर मंत्र्यांनी सांगितले.
या नवीन घडामोडींबद्दल पोद्दार प्लंबिंग सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दीपक पोद्दार म्हणाले, कर्नाटकमध्ये अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी निर्माण करत असतानाच औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्रगत पाइपिंग सोल्यूशन्समध्ये भारताला स्वावलंबी बनवण्याचे आमचे ध्येय आहे. आमची ही नवीन गुंतवणूक आमचे हेच दीर्घकालीन ध्येय अधिक मजबूत करते. वेमगलमधील नवीन सुविधा आणि विजयपुरा येथील आमच्या प्रस्तावित युनिटसह, जागतिक दर्जाची उत्पादने तयार करण्यावर आमचा भर आहे. यासोबतच स्थानिक प्रतिभेला चालना देण्याचे आणि राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
आशीर्वाद पाईप्सच्या प्रवर्तकांनी स्थापन केलेल्या या कंपनीचे 10 वर्षांत वार्षिक 1,500 कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य आहे. या प्रकल्पातून याच कालावधीत सरकारला महसूलापोटी अंदाजे 3,000 कोटी रुपयांचा कर मिळण्याचा अंदाज आहे. वेमागल साइटवर यंत्रसामग्री ठेवण्याच्या कामास आधीच सुरुवात झाली आहे. या कारखान्यात विविध प्रकारचे चांगल्या दर्जाचे पीव्हीसी पाईप्स आणि फिटिंग्ज तयार केले जातील. ज्यामध्ये प्लंबिंग, पाणी वितरणासाठी सीपीव्हीसी आणि यूपीव्हीसी पाईप्स, सिंचनासाठी कृषी पाईप्स आणि रसायने तसेच वायू वाहतुकीसाठी औद्योगिक पाईप्स यांचा समावेश आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
