* हल्लेखोर मॉरीस नोरोन्हा केली आत्महत्या, दोघे ताब्यात
* प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग
मुंबई, ९ फेब्रुवारी: दहिसरमधील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरीस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली. घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी तथाकथित सामाजिक कार्यकर्ता मॉरिस नोरोन्हा विरोधात पोलिसांकडून कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर हा गुन्हा आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान मेहुल पारीख आणि रोहित साहू या दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मॉरीस नोरोन्हा नावाच्या व्यक्तीने अभिषेक यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार केला. फेसबुक लाइव्ह सुरू असताना अभिषेक यांच्यावर एकामागून एक पाच गोळ्या झाडल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. गोळ्या झाडल्यानंतर मॉरीसने देखील स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात मॉरीसचा मृत्यू झाला. गोळीबार झाल्यानंतर अभिषेक यांना बोरीवलीच्या करूणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कालांतराने त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे गोळीबार जेव्हा झाला, त्यावेळी मॉरिसचा पीए मेहुल पारीख देखील घटनास्थळी उपस्थित असल्याचे बोलले जात आहे, तसा उल्लेख फेसबुक लाईव्हमध्ये घोसाळकर यांची हत्या करणाऱ्या मॉरीसने केला होता. तर मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत. सदर पिस्टल परदेशी बनावटीची आहे. विशेष म्हणजे मॉरीसकडे पिस्तुलाचा परवाना देखील नव्हता.
खासगी वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी गोळीबार करणारा मॉरिसचा पीए मेहुल पारीखला रात्रीच ताब्यात घेतले आहे. त्यानंतर रोहित साहू नावाच्या आणखी एकाला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी नेमकं काय घडलं, हत्या करण्याचे कारण काय?, घोसाळकर आणि मॉरिसमधील कोणता वाद होता? या सर्व प्रकरणाचा पोलिसांकडून आता तपास केला जात आहे. मेहुल पारीखच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची देखील शक्यता आहे.
याबाबत डीसीपी दत्ता नलावडे म्हणाले की, गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचे स्त्रोत आणि त्याची कायदेशीर मान्यतेची खात्री करत आहोत. घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळावरून दोन जखमींना उपचारासाठी दाखल केले होते, उपचारांती त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरून पुरावे संकलित करण्याचं काम पोलीस पथक करत आहे. फेसबुक लाईव्ह आणि इतर काही पुरावे तपासात घेतले जातील.
कोण आहेत अभिषेक घोसाळकर?
अभिषेक घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. अभिषेक हे मुंबईतील दहिसरच्या वार्ड क्रमांक एकचे माजी नगरसेवक होते. तसेच ते मुंबै बँकेचे संचालक देखील होते. घोसाळकर पिता-पुत्र सध्या उद्धव ठाकरे गटात आहेत. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी या देखील माजी नगरसेविका आहेत. बोरीवली मतदारसंघात घोसाळकर कुटुंबाची राजकीय ताकद आहे.
