नाशिक, २८ जानेवारी, : नाशिक मध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात मोठी नाराजी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. ही सर्व नाराजी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी भुसे यांना तोंडावरती बोलून दाखवल्याने भुसे यांची बोलती बंद झाली आहे.
शिवसेना फुटून त्यातून एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला. त्या गटामध्ये नाशिकचे दादा भुसे हे मालेगाव तालुक्यातील दाभाडी या मतदार संघाचे आमदार आहेत. ते मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि शिंदे गटाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. असे सर्व असताना दादा भुसे यांच्या विरोधात मात्र शिंदे गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी धुसफुस आहे .त्यांच्यावरती कार्यकर्त्यांची मोठी नाराजी आहे त्यामुळे ही अस्वस्थता अखेर फुटायला सुरुवात झाली आहे.
शनिवारी शिंदे गटाच्या शिवसेना कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे उशिराने सुरू झाला आणि पालकमंत्री दादा भुसे हे देखील उशिराने या ठिकाणी आले. हा कार्यक्रम झाला त्यानंतर दादा भुसे हे पक्षाच्या कार्यालयात गेले मात्र या ठिकाणी आधीपासूनच नाराज असलेले युवा सेनेचे कार्यकर्ते यांच्यातील धुसफूस सुरूच होती. पण कोणी बोलायची हिम्मत करत नव्हते. ज्यावेळी दादा भुसे हे पुन्हा जायला निघाले त्यावेळी मात्र यातील काही कार्यकर्त्यांना राहवले गेले नाही आणि त्यांनी दादा भुसे यांना खरे खोटे सुनावले. पक्षाचे मंत्री आहात. आज पक्ष नवीन आहे. परंतु साधे शिफारस पत्र मिळत नाही, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेली कामे होत नाही, शिवसेना शिंदे गटाकडून एखाद्या शासकीय कार्यालयात गेलं तर वेगळ्या प्रकारची वागणूक मिळते आहे .अशा स्वरूपाच्या तक्रारी युवा सेनेच्या वतीने कार्यकर्त्यांनी मांडल्या.. हे काही कमी होते की काय याचवेळी काही महिलांनी देखील आलेले अनुभव या ठिकाणी कथन केले पण या सर्व प्रकाराचा दादा भुसे यांच्यावरती तीळ मात्र परिणाम झाला नाही. दादा भुसे यांनी या सर्व तक्रारी ऐकून घेतल्या पण त्यावर कोणतेही आश्वासन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले नाही. किंवा कुठल्या कार्यालयात अनुभव आले कोणी काय अडचणी निर्माण केल्या. याबाबतची माहिती घेण्याची साधी तसदी देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली नाही. नेहमीप्रमाणे सर्व ऐकून घेतले आणि हात जोडून दादा भुसे निघून गेले.
पण या सर्वच परिणाम हा आता शिंदे गटातील कार्यकर्त्यांवरती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आता समोर येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गटातील या नाराजीचा कळस गाठला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
