सोलापूर, 16 जानेवारी, ( हिं.स) पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बॅंकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडून (शिखर बॅंक) वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली नाही. ३१ डिसेंबर २०२३ अखेर कर्ज रकमेचा भरणा न केलेले २५२ कोटी ४९ लाख आणि पुढील व्याज १७७ कोटी ६८ लाख, अशी ४२० कोटी १७ लाख रुपये रक्कम येणे, असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
श्री. घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असे नमूद करण्यात आले आहे की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना राज्य बॅंकेची सभासद असून कारखान्याने वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार बॅंकेने ऊस गाऴप हंगामासाठी,वीज निर्मितीसाठी तसेच इतर जोड उत्पादनांसाठी (इथेनॉल व आनुषंगिक उत्पादने) कर्ज मंजूर करून उचल दिलेली आहे. कारखान्याने या कर्जाच्या परतफेडीसाठी वेळोवेळी कारखान्याच्या मालकीची स्थावर मालमत्ता बॅंकेस गहाणखताव्दारे लिहून दिलेली आहे.
हिंदुस्थान समाचार
