नाशिक, २८ डिसेंबर (हिं.स.) : घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घरातील सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करून चोरून नेल्याची घटना बोरगड परिसरात घडली.
यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी नामदेव उखा झिरवाळ (वय ३६, रा. शामसृष्टी पार्क, बोरगड, नाशिक) हे आपल्या परिवारासह यात्रेनिमित्त गावाकडे गेले होते. दि. २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरात असलेले सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. काल (दि. २७) रात्री गावाकडून परतताच झिरवाळ यांना घरफोडी झाल्याचे समजले. या प्रकरणी झिरवाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
