ठाणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्ह्यातील उत्कृष्ट खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ठ क्रीडापटू (महिला व पुरुष), दिव्यांग खेळाडू तसेच गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कामाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणांतर्गत जिल्हा क्रीडा पुरस्कार योजना कार्यान्वित आहे. या पुरस्कारांतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक असे एकूण चार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
तसेच ठाणे जिल्ह्यातील युवक कल्याण क्षेत्रात विकासाचे कार्य करणाऱ्या युवांसाठी तसेच संस्थांसाठी जिल्हास्तरीय युवा पुरस्कार देण्यात येते. जिल्हा युवा पुरस्काराकरिता मागील वर्षातील युवक, युवती व संस्था यांच्या सर्वोत्कृष्ट तीन वर्षातील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ठाणे जिल्ह्यातील मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील उत्कृष्ट खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच जिल्हा युवा पुरस्कारासाठी युवक कल्याण व विकास कार्यात अग्रेसर असलेले युवक, युवती व संस्था यांनी विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे (प) येथून प्राप्त करुन घ्यावेत. या पुरस्कारासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज दि. २० डिसेंबर २०२३ पूर्वी अथवा पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे येथे बंद लिफाफ्यात सादर करावी.
तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे (दूरध्वनी क्रमांक- 022 25368755) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सूवर्णा बारटक्के यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
