प्रवासी आणि माल गाडीची झाली टक्कर
ढाका, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : बांगलादेशात आज, सोमवारी 2 रेल्वे एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ढाका शहरानजीकच्या कृष्णगंज जिल्ह्यात मालगाडी आणि प्रवासी रेल्वेची टक्कर होऊन हा अपघात घडला. दरम्यान या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या अपघाताबाबत बांगलादेशच्या रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रवासी रेल्वे कृष्णगंज ते ढाका जात असताना हा अपघात झाला. आतापर्यंत घटनास्थळाहून 20 मृतदेह आढळून आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. या दुर्घटनेत 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेकांची स्थिती गंभीर असल्याने मृत्यूचा आकडा वाढू शकतो असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अनेकजण अपघातग्रस्त रेल्वे कोचच्या खाली अडकले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु झाले आहे. दरम्यान अपघातातील मृतकांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
हिंदुस्थान समाचार
