नाशिक, २० ऑक्टोबर :- विनापरवाना बेकायदेशीररीत्या साडेतीन लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा करून खरेदी-विक्री केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी ज्ञानेश्वर पंढरीनाथ चित्ते (वय 41, रा. पांडाणे, ता. दिंडोरी), महेश प्रकाश टर्ले (वय 32, रा. शिंपी टाकळी फाटा, चांदोरी, ता. दिंडोरी), युवराज दुगजे व अज्ञात उत्पादक व पुरवठादार यांनी दिंडोरी रोडवरील साई मंदिराजवळ असलेल्या एका दुकानात विनापरवाना अवैधरीत्या बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुमारे 3 लाख 48 हजार 620 रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा केला. तसेच या कीटकनाशकांची खरेदी-विक्री केल्याने शासनासह शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केली.
या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कीटकनाशक निरीक्षक जगन भावराव सूर्यवंशी यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चार जणांपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे.
