पुणे, 20 ऑक्टोबर – शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकणे, नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे तसेच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी खोदाई करण्यासाठी महापालिकेकडून महावितरणला आकारण्यात येणाऱ्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील इतर निमशासकीय तसेच शासकीय संस्थांना महापालिका खोदाई शुल्कात 50 टक्के सवलत देते. त्याच वेळी महावितरणला मात्र, जवळपास 80 टक्के सवलत होती. त्यामुळे ही सवलत कमी केली जाणार महावितरणला आता अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.
दरम्यान, महावितरणच्या आडून खोदाई परवानगी घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनाही या दरवाढीमुळे आळा बसणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे. दरम्यान महापालिकेच्या स्थायी समितीपुढे गेल्या दोन वर्षांपासून शुल्कवाढीचा प्रस्ताव प्रलंबित असताना त्याकडे मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
