सोलापूर 17 ऑक्टोबर ( हिं.स) : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांना ग्रंथालय उपलब्ध नाही अशा सर्व शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार करून ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या सर्व शाळांना ग्रंथालयासाठी किमान शंभर पुस्तके तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 व 23-24 चा जिल्हा परिषद यंत्रणांच्या विविध विभागांच्या आढावा प्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेमध्ये एक चांगले ग्रंथालय असणे आवश्यक आहे. त्या ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध प्रकारचे पुस्तके असावीत. यासाठी शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना तात्काळ किमान शंभर पुस्तकाची यादी तयार करण्यास कळवावे व ती सर्व पुस्तके आपण स्वतः तात्काळ खरेदी करून देणार असून प्रत्येक शाळेत ग्रंथालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ती पुस्तके शाळेत तसेच वाचण्यासाठी घरी रोटेशन पद्धतीने घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या 35 शाळा महापालिकेच्या हद्दपार भागात आलेले आहेत. त्या सर्व शाळांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असल्याने नियोजन समितीमध्ये तात्काळ उपलब्ध करण्यात येईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दोन भाषा एकूण 22 शाळांमध्ये दहा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करावे. त्यासाठी आवश्यक असलेला प्रति शाळा दीड ते दोन लाखाचा निधी तसेच जिल्ह्याच्या प्रत्येक शाळेत ,स्वच्छतागृह व अन्य पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर फंडातून उपलब्ध केला जाईल.
हिंदुस्थान समाचार
