नाशिक, १६ ऑक्टोबर : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या संघामध्ये नाशिक जिल्हाध्यक्षपदी ॲड विशाल बलकवडे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणारी ६६ वी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुणे येथे वाघोली लोणीकंद जवळ फुलगाव येथे होणार आहे.
१ ते ७ नोव्हेंबर दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आधिकृत घोषणा केली आहे. स्पर्धेसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खा.तडस, सरचिटणीस पै. योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याची निवडचाचणी २९ ऑक्टोबर रोजी बलकवडे व्यायामशाळा या ठिकाणी होणार असल्याची माहिती नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ॲड. बलकवडे यांनी दिली.
स्पर्धा १० वजन गट- गादी आणि माती गटात होणार आहे. यावेळी रुंजा काळे, दिपक जुंद्रे, विलास कड, सनी मेढे, नाना मोरे, संजय गायकवाड, दिलीप सोनवणे, संदीप दरेकर, जिवन शिंदे, गौरव गणोरे, बाळू बिन्नर, अविनाश सहाने, दिपक नंदाळे, गणेश सुर्यवंशी, अजंठा काळे, विजय गामने, विकी मोरे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील कुस्तीपटू व मान्यवर उपस्थित होते.
