पुणे 8 ऑक्टोबर : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ‘एमबीबीएस’नंतरच्या पदव्युत्तर पदविका (डीएनबी) अभ्यासक्रमाच्या चार विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थी उपलब्ध होताच हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नवीन थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालयात पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याबाबत महापालिकेने दिल्लीतील राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील पायाभूत सुविधा, वसतिगृहाची पाहणी केली. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास ६ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. १४ डॉक्टरांच्या जागांना मंजुरी मिळाली आहे. थेरगाव रुग्णालयासाठी १२, तर भोसरी रुग्णालयासाठी दोन जागा असणार आहेत. त्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोग, भूलतज्ज्ञ विषयांचा समावेश आहे.
