पुणे 7 ऑक्टोबर : रुग्णालयात दाखल प्रत्येक कैदी रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा तातडीने घ्यावा. कैदी नेमका उपचाराच्या कोणत्या टप्प्यावर आहे, याची तज्ज्ञ डॉक्टरांकडून माहिती घ्यावी. तसेच, उपचार पूर्ण झालेल्या कैद्यांची तातडीने परत कारागृहात रवानगी करावी,’’ असे आदेश बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिले.
ससून रुग्णालयात कैदी रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारांबद्दल आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातून ससून रुग्णालयातील प्रशासन आणि डॉक्टरांवर आरोपांची राळ उडाली आहे. कारागृहातून आलेल्या ‘विशेष’ रुग्णांनाच ससून रुग्णालयातील आलिशान कक्षात उपचार दिले जातात. कारागृहातील इतर कैद्यांना असे उपचार का मिळत नाहीत, या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. ठाकूर म्हणाले, ‘‘ससून रुग्णालय उपचारासाठी कोणत्या कैद्यांनी यावे यावर आमचे नियंत्रण असू शकत नाही. पण, येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार देण्याची जबाबदारी आमची आहे. हे उपचार कायदेशीर चौकटीत राहून केले जातात. सद्यःस्थितीत ससून रुग्णालयाच्या कैदी कक्षामध्ये सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचाराची अद्ययावत माहिती घेण्याची सूचना रुग्णालयातील कैदी समितीला दिल्या आहेत. अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील हा शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशीच ससून रुग्णालयातून फरार झाला. शस्त्रक्रियेचा रुग्ण फरार कसा होऊ शकतो.
याबद्दल ते म्हणाले, ‘‘या कैद्यावर शस्त्रक्रिया नियोजित केली होती. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने काही कैदी रुग्णांच्या उपचाराबद्दलची माहिती मागविली होती. त्यात या कैद्याचाही समावेश होता. त्यावेळीही शस्त्रक्रिया आवश्यक असल्याची माहिती दिली आहे.
