रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी धावनगरी रत्नागिरी या टॅगलाइनने होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये पहिल्याच वर्षी एक हजाराहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ही मॅरेथॉन होण्याकरिता आयोजक सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि सर्व सहकारी संस्था आणि रत्नागिरीकरांचे प्रयत्न सुरू आहेत.
स्पर्धेत एन्फ्लुएन्सरप्रमाणे पेसर हेदेखील या स्पर्धेत रत्नागिरीकरांना प्रथमच पाहायला मिळणार आहेत. पेसर म्हणजे एखादी व्यक्ती एखादे अंतर ठरावीक वेळेत पार करते म्हणून त्यांना पेसर घोषित केले जाते. कोणाकडे मोबाइल, गॅझेट नसेल, पण ठरावीक वेळेमध्ये अंतर पार करायचे असेल तर पेसर्सबरोबर धावल्यानंतर आपले अंतर तेवढ्या वेळेत पार करू शकतो. असे नियमित सराव करणारे धावपटू ठरलेल्या वेळेत २१ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. हाफ आयर्नमॅन असलेले रत्नागिरीचे समीर धातकर हे या स्पर्धेत १ तास ५९ मिनिटांमध्ये २१ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. अन्य स्पर्धक त्यांच्यासोबत धावू शकतात. ज्यांना ही स्पर्धा दोन तासांच्या आत पूर्ण करायची आहे, ते समीरसोबत धावू शकतात. चिपळूणचे डॉ. स्वप्नील दाभोळकर २१ किलोमीटर अंतर २ तास ३० मिनिटांमध्ये पार करणार आहेत. ते या स्पर्धेचे पेसर आहेत. यांच्यासोबतही अन्य स्पर्धक धावू शकतात. तसेच पावणेतीन व तीन तासांतही हे अंतर पार करणारे पेसर कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
स्पर्धेत १० किलोमीटरच्या सर्व पेसर रत्नागिरी शहर आणि आसपासच्या महिला आहेत. युगंधरा मांडवकर ५४ मिनिटांत, सत्त्वशीला पाडावे ६५ मिनिटांत, उमली पाटील ७५ मिनिटांत तर आरती दामले-पानवलकर ९० मिनिटांत दहा किलोमीटर अंतर पार करणार आहेत. खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट म्हणता येईल अशी ही संधी आहे.
हिंदुस्थान समाचार
