* सलग नववा विजय
बंगळुरू, १२ नोव्हेंबर : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज भारताने नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर या विश्वचषकात सलग नऊ सामने जिंकत भारतीय संघाने इतिहास रचला आहे. आता भारताचा पहिला सेमीफायनल सामना बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे.
विश्वचषक स्पर्धेतील ४५ वा सामना आज बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात अवघे चार गडी गमावत ४१० धावांचा डोंगर उभा केला. त्याच्या प्रत्युत्तरात मैदानात उतरलेला नेदरलँड्स संघ ४७.५ षटकांत सर्व बाद २५० धावांपर्यंत मजल मारत तंबूत परतला. त्यामुळे भारताचा १६० धावांनी दणदणीत विजय झाला. या सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलने झंझावाती शतके साजरी केली. श्रेयस अय्यरने ९४ चेंडूंत १० चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद १२८ धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलने ६४ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांसह १०२ धावा केल्या. भारतीय फलंदाजांनी या सामन्यात नेदरलँड्सच्या दुबळ्या आक्रमणाचा पुरेपूर लाभ उठवला. भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतकं झळाकवली. रोहितने ६१, शुभमनने ५१ आणि विराटने ५१ धावांची खेळी केली. १०० धावांवर भारताचा पहिला गडी बाद झाला.
नेदरलँड्सकडून तेजा निदामनुरू याने ३९ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. भारताकडून कुलदीप यादव, सिराज आणि बुमराह यांनी प्रत्येकी दोन, तर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. विराट कोहलीने तीन षटकांत १३ धावा दिल्या.
