नवी दिल्ली, 30 ऑगस्ट (हिं.स.) राहुल द्रविडने आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्सची साथ सोडली आहे. राजस्थान रॉयल्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. फ्रँचायझीने सांगितले की, द्रविडने आयपीएल २०२६ हंगामापूर्वी फ्रँचायझीच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये द्रविडची राजस्थानच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. भारतीय संघाला २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचा विजेता बनवल्यानंतर द्रविडने राजस्थान रॉयल्सशी करार केला होता. माजी फलंदाज राहुल द्रविडचे राजस्थान रॉयल्सशी दीर्घकाळ संबंध आहेत. त्याने आयपीएलमध्ये या संघाचे नेतृत्वही केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान २०१२ आणि २०१३ मध्ये खेळला होता. तो २०१४ आणि २०१५ मध्ये संघाचा मार्गदर्शक देखील होता. त्यानंतर, २०१६ मध्ये अनुभवी क्रिकेटपटू दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झाला होता. यानंतर द्रविड पुन्हा राजस्थान फ्रँचायझीशी जोडला गेला. पण यावेळी त्याचा प्रवास पूर्ण एक वर्षही टिकू शकला नाही.
आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी चांगली झाली नव्हती, आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकले नाही. द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून संघात आल्यानंतर राजस्थानला मोठ्या आशा होत्या. पण संघ अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. गेल्या आयपीएल हंगामात १४ सामन्यांमध्ये चार विजय आणि १० पराभवांसह राजस्थानचा संघ आठ गुणांसह नवव्या स्थानावर राहिला. राजस्थानने फक्त एकदाच आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. २००८ च्या पहिल्या हंगामात दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून संघ विजेता बनला होता. आणि तेव्हापासून या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम आहे.
राजस्थानने एक निवेदन जारी केले की, राजस्थान रॉयल्सने घोषणा केली की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने आयपीएल २०२६ च्या आधी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. द्रविड अनेक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या नेतृत्वाचा अनेक क्रिकेटपटूंवर प्रभाव पडला आहे. फ्रँचायझी स्ट्रक्चरल रिव्ह्यूचा भाग म्हणून राहुल द्रविडला फ्रँचायझीमध्ये मोठे पद देण्यात आले होते. पण त्याने ते स्वीकारण्याचा निर्णय घेतला नाही. राजस्थान रॉयल्स, त्यांचे क्रिकेटपटू आणि जगभरातील लाखो चाहते राहुलने फ्रँचायझीसाठी केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचे आभार मानत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
