लासलगाव, २१ डिसेंबर (हिं.स.) – सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगरपरिषद व महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत लासलगाव येथील श्रावणी निलेश देसाई हिने ५ किलोमीटर स्पर्धेत चांगली कामगिरी करत महाराष्ट्रात ६ वा क्रमांक पटकावला आहे.येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे दिनांक १६ व १७ डिसेंबर रोजी सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील श्रावणी देसाई हिने १६ ते १८ या वयोगटात ५ किलोमीटर सागरी स्पर्धेत १ तास २४ मिनिटे वेळ देत राज्यात ६ वा क्रमांक पटकावला
स्पर्धेनंतर आमदार वैभव नाईक,मालवण नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते श्रावणी देसाई हिला पदक,प्रमाणपत्र,रोख बक्षीस व जलतरण साहित्य भेट देऊन सन्मान करण्यात आला. श्रावणी देसाई हिने नुकतीच पालघर जिल्ह्यातील राजोडी समुद्र किनाऱ्यावर झालेल्या १ किलोमीटर सागरी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.५ किलोमीटर स्पर्धेत तिने पहिल्यांदाच सहभाग घेतला व यशस्वी, चांगली कामगिरी केली.
हिंदुस्थान समाचार
