ठाणे, 2 डिसेंबर (हिं.स.) कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला असल्याने व हा मातीचा खेळ असल्याने कबड्डी खेळाडू मातीवर खेळतात. या खेळाचा सराव मातीवर तर करतात. त्याचबरोबर या खेळाडूंनी सिंथेटिक रबर मॅटवर खेळले पाहिजे. जिल्हा संघटनांनी त्यांचा सराव देखील मॅटवर करून घेतला पाहिजे. यासाठी सर्व जिल्हा संघटनांनी खेळाडूंना सिंथेटिक रबर मॅट उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी अपेक्षा खासदार गजानन किर्तीकर यांनी ठाणे येथे व्यक्त केले. ते येथील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरीत राज्यस्तरीय मुख्यमंत्री चषक कुमार- कुमारी गट अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
ठाण्यातील रेमंड मैदान येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडा नगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वी सुवर्ण महोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख व ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सचिव बाबुराव चांदेरे, ठाणे जिल्हा कबड्डी अशोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, सचिव मालोजी भोसले, परिवहन समिती सभापती विलास जोशी, स्पर्धेचे मार्गदर्शक माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, माजी नगरसेवक उमेश पाटील व दिलीप बारटक्के, पोलीस उपायुक्त अमरजीत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे, प्रशांत जाधवर फाऊंडेशनचे प्रशांत जाधवर, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, नगरसेविका वनिता घोगरे, माजी नगरसेवक दिंगबर ठाकूर, संतोष पाटील, पुरुषोत्तम ठाकूर, राज्य संघटनेचे खजिनदार मंगल पांडे व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व कार्यकारणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत हनुमंत जगदाळे यांनी केले तर बाबुराव चांदेरे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत किशोर ३१ व किशोरी ३१ संघांसह १२५० खेळाडू व पदाधिकारी, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. पोलीस बॅंडच्या तालावर खेळाडूंनी संचालन केले. पूजा सुर्वे यांच्या टीमने रिदमिक जिम्नॅस्टीक्सचे आयोजनही यावेळी करण्यात आले होते.
पहिल्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात कुमार विभागात `ड’ गटात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ठाणे ग्रामीण संघाने नासिक शहर संघावर ३१-२९ असा निसटता विजय मिळवत आपल्या गटात विजयी सलामी दिली. मध्यंतराला दोन्ही संघ १३-१३ अशा समान गुणांवर होते. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीच्या चाललेल्या सामन्यात ठाण्याच्या दिव्येश पाटील याने चौफेर चढाया करीत हल्ला चढवला व आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हर्ष भोईर याने चांगल्या पकडी घेत नासिकचे आक्रमण थोपवले. नासिक शहरच्या ऋषी दावांगे याने शेवटपर्यंत प्रयत्नांची शिकस्त केली मात्र त्याला यश आले नाही, पराभवाला सामोरे जावे लागले. ज्ञानेश्वर शेळके याने चांगल्या पकडी घेतल्या.
`क’ गटात झालेल्या सामन्यात पुणे ग्रामीण संघाने धुळे संघावर ४१-२४ अशी मात करीत आपल्या गटात विजय मिळवला. मध्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे १८-११ अशी आघाडी होती. पुणे ग्रामीण संघाच्या कृष्णा चव्हाण व विकास जाधव यांनी जोरदार चढाया करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली व विजय मिळवला. देव शिर्के व स्वप्नील कोळी यांनी चांगल्या पकडी घेतल्या. धुळ्याच्या निखील भादाणे याने चांगल्या प्रतिकार केला तर कमलेश जाधव यांनी पकडी घेतल्या. `ब’ गटात जालना संघाने अहमदनगर संघावर ३७-२८ अशी मात करीत विजय मिळवला. जालन्याच्या विरेंद्र मंडलिक, ओमराज उखरदे व सौरभ धामोडे यांनी जोरदार खेळ केला. अहमदनगरच्या विशाल ब्राम्हणे याने उत्कृष्ठ चढाया केल्या. संकेत खलाते याने चांगला प्रतिकार केला.
कुमारी विभागात `क’ गटात झालेल्या सामन्यात परभणी संघाने हिंगोली संघावर ६०-१५ अशी दणदणीत मात करीत आपल्या गटात विजय मिळवला. मध्यंतराला परभणी संघाकडे ३३-६ अशी भक्कम आघाडी होती. परभणीच्या गौरी दाहे हिने जोरदार खेळ करीत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली. गायत्री अवचारे हिने सुरेख पकडी घेतल्या. हिंगोली संघाच्या कशिष गिरी हिने काहीसा प्रतिकार केला तर पूजा शेंबडे हिने चांगल्या पकडी घेतल्या. `ई’ गटात अत्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात मुंबई उपनगर (पश्चिम) संघाने ठाणे ग्रामीण संघाचा २६-२५ असा अवघ्या १ गुण फरकाने विजय मिळवला. मध्यंतराला मुंबई उपनगर पश्चिम संघ १०-१६ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर मात्र मुंबई उपनगर प. संघाच्या आकांक्षा बने हिने जोरदार चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. नयन झा हिने चांगली साथ देत उत्कृष्ट पकडी घेतल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या सानिया गायकवाड हिने सुरेख खेळ केला तर वेदिका ठाकरे हिने सुरेख पकडी घेतल्या.
हिंदुस्थान समाचार
