मुंबई, 7 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हटले जाते. जगातील कोणतेही क्रिकेट बोर्ड बीसीसीआयपेक्षा जास्त पैसे कमवत नाही. यामुळेच भारतीय क्रिकेटपटूंना जगात सर्वाधिक मानधन मिळते. बीसीसीआयच्या उत्पन्नाबाबत अलीकडील अहवाल समोर आला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत भरघोस कमाई केली आहे.
बीसीसीआयने गेल्या ५ वर्षांत १४,६२७ कोटी रुपये कमावले आहेत. त्यापैकी ४,१९३ कोटी रुपये गेल्या आर्थिक वर्षातच आले आहेत. बीसीसीआयची बँक बॅलन्स २०,६८६ कोटी रुपये झाला आहे. ही माहिती एका अहवालातून मिळाली आहे. राज्य संघांना सर्व देणी दिल्यानंतरही सामान्य निधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये हा निधी ३,९०६ कोटी रुपये होता. जो २०२४ मध्ये जवळजवळ दुप्पट होऊन ७,९८८ कोटी रुपये झाला आहे.
२०२४ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर केलेल्या खात्यांमध्ये असे म्हटले आहे की, २०१९ पासून बीसीसीआयच्या रोख आणि बँक ठेवी ६,०५९ कोटी रुपयांवरून २०,६८६ कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. त्यात म्हटले आहे की ६,०५९ कोटी रुपये राज्य क्रिकेट संघटनांना पैसे दिले गेले नाहीत तेव्हाचे होते. तर २०,६८६ कोटी रुपये राज्य क्रिकेट संघटनांच्या देणी दिल्यानंतरचे आहेत.
————–
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
