ठाणे, 24 ऑक्टोबर (हिं.स.) साथी संजीव साने यांचे जाणे ठाणेकरांना चटका लावून गेले आहे. गेल्यावर्षी २८ ऑक्टोबर रोजी त्यांचे निधन झाले. संजीव साने गेली काही वर्षे स्वराज इंडिया संघटनेत राष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते, त्याचबरोबर परिवर्तन,शोषणमुक्ती, धार्मिक जातीय ध्रुवीकरण विरोधी लढे यासाठी काम करणाऱ्या सामाजिक राजकीय संघटनांच्या पाठीशी ताकद निर्माण करण्याचे काम करीत होते. त्यांच्या निधनाने राजकीय पर्याय शोधणाऱ्या पक्ष,संघटना,संस्थांची अपरिमित हानी झाली आहे.
संजीव साने यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त साथी योगेंद्र यादव ठाण्यात येत आहेत. ‘२०२४ च्या निवडणुकांमधीलआव्हाने’ यावर जाहीर विचारमंथन करणार आहेत. व्यापक स्तरावर आजच्या घडीची आव्हाने ओळखून त्यावर पर्याय म्हणून सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा घेणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज इंडिया, महाराष्ट्राचे साथी ललित बाबर असतील.
शेतकरी आंदोलन, राहुल गांधीप्रणित भारत जोडो यात्रा यातून नवे राजकीय पर्याय उभे राहात आहेत. यावेळी आजच्या घडीची आव्हाने ओळखून पर्यायांच्या मागे ताकद लावण्याची गरज आहे. साथी योगेंद्रजींच्या भाषणाच्या निमित्ताने परिवर्तनवादी गटांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे हेच संजीव साने यांचे उचित स्मरण ठरेल. म्हणून साथी योगेंद्र यादव यांना ऐकण्यासाठी ठाण्यातील सावित्रीदेवी थिराणी हायस्कूल, वर्तकनगर, ठाणे येथे २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ठीक ५ वा. मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक, स्वराज इंडिया, ठाणे तर्फे राजेंद्र चव्हाण आणि सुब्रतो भट्टाचार्य यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार
