सोलापूर 16 ऑक्टोबर (हिं.स.) :पूर्व भागातील तेलुगु भाषिक समाजाचा आनंद उत्सव म्हणून हा पुष्पोत्सव ओळखला जातो. नवरात्र निमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेलंगाणा प्रांतातली महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या ते अष्टमी पर्यंत साजरा करतात. हळदीने गौरीदेवी बनवनू निसर्गातील विविध रंगी फुले आणतात. फुलांचा गोपुर बनवून पारंपरिक लोकगीते म्हणतात.हा उत्सव ज्येष्ठ महिला घरात सुख शांती ऐश्वर्य प्राप्तीसाठी, विवाहित महिला संतानप्राप्तीसाठी, कुमारी उत्तम वर मिळण्यासाठी या ब्रतुकम्मा भोवती फेर धरतात. ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो (आयुष्यवंत हो, किर्तीवंत हो म्हणत अंगाई गीत गातात.) म्हणत स्त्रिया युवती, कुमारिका फेर धरतात.
यंदा ब्रतुकम्मा उत्सव तेलंगानात साजरा करण्यात येत आहे. सोलापुरातील पूर्व भागात प्रत्येक घराघरात ही तेलंगाना संस्कृती या नवरात्रोत्सवाच्या अष्टमी दिनी दिसून येते. भल्या पहाटेच घरासमोर सडा, रांगोळी घालणे, विविध रंगाच्या फुलांनी सुंदर ब्रतुकम्मा तयार केले जाते. गौरी देवीस नैवेद्यासाठी गूळ, शेंगा, बडिशेप, ईलायची, फुटाणे, तुपापासून बनविलेले चविष्ट लाडू (मलिदा लाडू), पुलोहरा, दहीभात, गोड भात बनवून नैवेद्य दाखवला जातो.
हिंदुस्थान समाचार
