मालेगाव, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांमुळे मालेगावातील चाहत्यांनी कमलदिप चित्रपटगृहात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस या ठिकाणी दाखल झाले, परंतु या ठिकाणी गोंधळ सुरू होता. त्यामुळे काही काळ चित्रपटाचे प्रसारण हे थांबविण्यात आले. कालांतराने पुन्हा चित्रपट सुरू झाला. यावेळी फटाके फोडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले.
मालेगावमध्ये मुस्लिमबहुल क्षेत्र आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्या आवडत्या सिनेतारक-तारका यांना प्रतिसाद देण्यासाठी म्हणून कधी फटाके वाजवणे, कधी चिल्लर फेकणे, कधी ढोल-ताशा वाजवणे, गाणे म्हणणे यांसारख्या घटना घडतच असतात. मधल्या काळामध्ये या घटना पोलिसांनी बंद केल्या होत्या. पण शुक्रवारी मात्र पुन्हा एकदा अशीच घटना मालेगावमध्ये घडली. येथील कमलदिप सिनेमागृहात शाहरुख खानच्या बहुचर्चित जवान चित्रपटाच्या शुक्रवारी रात्रीच्या शोच्या वेळी चाहत्यांनी त्याचे गाणे डायलॉग सुरु होताच सिनेमागृहात फटाक्यांची आतिषबाजी केली. यावेळी केलेल्या या आतषबाजीमुळे सिनेमागृहात काही काळ सर्वांचा गोंधळ उडाला. मालेगावमध्ये ही नवीन गोष्ट नाही. पण, अचानक केलेल्या या आतषबाजीमुळे इतर प्रेक्षकांना नेमकं कळालेच नाही.
हिंदुस्थान समाचार
