मुंबई, 7 डिसेंबर (हिं.स.) : ॲपच्या चांगल्या कार्यासाठी यूटीएस मोबाइल ॲपमध्ये बदल लागू करण्यात आले. मध्य रेल्वेमध्ये (५ विभागात) एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ मध्ये १४.७६ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाइल ॲपचा वापर केला आणि त्यातून रू. १६१.७५ कोटीचे उत्पन्न प्राप्त झाले. मुंबई विभागात १४.४४ कोटी प्रवाशांनी यूटीएस मोबाईल ॲप वापरला आणि त्यातून रू. १५५.८६ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.
१. मुंबई विभागाने, चुकीच्या पासवर्डमुळे ॲप लॉक होण्याची वेळ ६० मिनिटांवरून १५ मिनिटांवर आणली आहे.
२. यूटीएस ॲप आणि पेमेंट ॲप दरम्यान टॉगल न करता थेट यूपीआय मोडद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय प्रदान करून पेमेंट प्रक्रिया सुलभ केली.
३. पूर्वी स्रोत स्थानकापासून यूटीएस तिकीट बुक करण्याची बाह्य मर्यादा उपनगरीय स्थानकांसाठी ५ किमी आणि गैर-उपनगरी (Non-suburban) स्थानकासाठी २० किमी होती, आता ती अनुक्रमे २० किमी आणि ५० किमी करण्यात आली आहे.
४. मार्च २०२३ पासून यूटीएस ॲप मध्ये किमान रु. ५० चे ऑनलाइन मोडद्वारे रिचार्जचे बदल करण्यात आले आहेत.
५. हँडसेट बदलण्याची विनंती करण्याची प्रक्रिया सरलीकृत करण्यात आली आहे. परिणामी रेल्वेवरील तक्रारी कमी झाल्या आहेत. वापरकर्ते त्याच्याकडे वैध प्रवास/सीझन तिकीट असेल तरी आता हँडसेट बदलाच्या विनंतीवर प्रक्रिया करू शकतात. जर वापरकर्त्याने जाणूनबुजून हँडसेट बदलण्याची निवड केली तर ॲपला तिकीट सिंक होण्यासाठी एक तास लागेल. तथापि, हँडसेट बदल सक्तीने (म्हणजे हँडसेट बदलणे आणि जुन्या डिव्हाइसमध्ये हँडसेट बदलण्याची विनंती सुरू न करता नवीन डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न) केल्यास, नवीन हँडसेटमध्ये तिकीट समक्रमित होण्यासाठी ॲपला २४ तास लागतील.
६. दि. १९.०१.२०२३ पासून एका तिकिटावर प्रथम श्रेणी आणि वातानुकुलित ईएमयू साठी जास्तीत जास्त ४ प्रवाशांचे बुकिंग यूटीएस ॲपवर मिळण्यासाठी सक्षम केले आहे.
७. ॲप आता हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेतही उपलब्ध आहे.
हिंदुस्थान समाचार
