मुंबई, 7 ऑक्टोबर (हिं.स.) : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे मालाड (पूर्व) येथील मालाड टेकडी जलाशयावरील ईनलेट व आऊटलेटवरील असणार्या झडपा, जुन्या व खराब झाल्यामुळे एकूण १० जलद्वार बदलण्याचे काम प्रस्तावित असून संपूर्ण काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे जसे की, ९०० मिली मीटर व्यासाचे तीन व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०४ जलद्वारे (वॉल्व) सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्यात येणार आहेत. दुस-या टप्प्यातील कामे जसे की, ९०० मिली मीटर व्यासाचे ०२ व ७५० मिली मीटर व्यासाचा ०१ असे एकूण ०३ जलद्वार शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी बदलण्यात येतील.
सदर कालावधीत सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत (१६ तास) ‘पी उत्तर’ विभागातील मालाड (पूर्व), ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव (पूर्व) आणि ‘आर दक्षिण’ विभागातील काही परिसरांमध्ये संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहील.
‘पी उत्तर’, ‘पी दक्षिण’ आणि ‘आर दक्षिण’ विभागातील पाणीपुरवठा खंडित होणा-या परिसरांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे आहे :-
१) ‘पी उत्तर’ – मालाड (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
२) ‘पी दक्षिण’ – गोरेगाव (पूर्व) परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
३) ‘आर दक्षिण’ – कांदिवली (पूर्व) येथील बाणडोंगरी, झालावाड नगर, अशोकनगर (काही भाग), लोखंडवाला, हनुमान नगर, वडारपाडा – १ व २, नर्सीपाडा परिसर – पाणीपुरवठा पूर्णपणे बंद.
संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाणी कपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
हिंदुस्थान समाचार
