गोंदिया ०६ ऑक्टोंबर (हिं. स.) : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यामधल्या चिचगावटोला येथे निर्माणाधिन जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आला. जलकुंभाचे बांधकाम मानक आणि नियमानुसार नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
गोंदिया जिल्ह्यात ४७६ कोटी खर्चातून जवळपास २५० गावांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणी टाकीचे निर्माण करण्यात येत आहे. मात्र, या निर्माणाधीन कार्याला देखील अनियमिततेचे गालबोट लागले आहे. असाच प्रकार गोरेगाव तालुक्यातील चिचगावटोला येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी जि. प. सदस्याने जिल्हा परिषदेकडे ६ महिन्यांपूर्वी तक्रार केली होती. तक्रार करूनही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत पाणी टाकीची पाहणी केली. या पाणी टाकीच्या कामात दोष आढळल्यानंतर निर्मानधीन बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सबुरी कन्स्ट्रक्शन कंपनीला ५० हजार रुपये दंड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठोठावला आहे. जिल्ह्यातील जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या इतर पाणी टाकीची तपासणी केल्यास अनेक बांधकामात दोष आढळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हिंदुस्थान समाचार
