* बीड, नांदेड मिळून एकूण पाच गुन्हे दाखल
बीड, : बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी मनाई आदेश जारी केले होते. त्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह १५० ते २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी रॅली काढण्यास आणि सभा घेण्यास परवानगी नाकारली होती. तरीही बीड शहरातील नाळवंडी नाका परिसरासह उमरद फाटा येथे सभा घेतली आणि रॅली काढली होती. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासह २०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला. या दरम्यान विनापरवानगी सभा आयोजन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन तसेच जेसीबीचा असुरक्षितरित्या वापर आदींचा समावेश आहे. या अनुषंगाने पेठ बीड पोलीस ठाण्यात जरांगे यांच्यासह अन्य २०० जणांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान यापूर्वी देखील बीडच्या अमळनेर आणि शिरूर पोलीस ठाण्यात मनोज जारंगे यांच्यावर रास्ता रोको प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांत जरांगे यांच्यावर तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. सोमवारी रात्री देखील मनोज जरांगे यांच्याविरोधात नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मनोज जरांगे यांची नांदेडमध्ये रात्री ११.३० वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यलयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला परवानगी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ५ तारखेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू केली होती. तसेच आंदोलन, उपोषण, रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती. असं असूनही बैठक घेतल्याने मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्यात आला.
