सिंधुदुर्ग, 8 ऑक्टोबर : भारतीय डाक विभागातर्फे दि. ९ ते १३ आक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा केला जाणार आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात ९आक्टोबर हा “जागतिक टपाल दिन” साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग डाक विभागाचे अधिक्षक मयुरेश कोले यांनी दिली.
सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना व बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार डाक विभागातर्फे केला जाणार आहे.
या वर्षीच्या जागतिक टपाल दिनाची थीम “TOGETHER FOR TRUST” म्हणजेच “विश्वासासाठी एकत्र” अशी आहे. या वर्षीचा डाक सप्ताह अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. यात सिंधुदुर्ग विभागामार्फत “डाक सामुदायिक विकास कार्यक्रम” अंतर्गत पोस्टाच्या सर्व सेवा व सुविधा एकाच दिवशी, एकाच ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष “डाक-चावडी” (DCDP Camp) चे आयोजन केले जाणार आहे.
यासाठी डाक विभाग पूर्णपणे सज्ज असुन पुढीलप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन विभागामार्फत करण्यात आले आहे. दि. ९ ऑक्टोंबर रोजी जागतिक टपाल दिन, मालवण, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, सिंधुदुर्गनगरी, वेंगुर्ला इ. विवडक पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट फोरम मिटिंग.दि. १० ऑक्टोंबर रोजी वित्तीय सशक्तीकरण दिवस, धामापूर (मालवण), उंबर्डे (वैभववाडी), मळगाव (सावंतवाडी) लोरे-१ (कणकवली) या ठिकाणी डाक- चावडी चे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ऑक्टोंबर रोजी फीलाटेली दिवस, जिल्ह्यातील मालवण व सावंतवाडी प्रधान डाकघर येथे पोस्टाच्या विशेष फीलाटेली तिकिटांचे प्रदर्शन. दि.१२ ऑक्टोबर रोजी मेल्स व पार्सल डे, वितरण सेवा अधिक प्रभावी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोस्टमन व वितरण प्रणालीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी कार्यशाळा. दि. १३ ऑक्टोंबर रोजी अंत्योदय दिवस , जिल्ह्यातील इन्सुली (सावंतवाडी), नेमळे (वेंगुर्ला), देवगड, विजयदुर्ग (देवगड), ओझरम, नवडवे (कणकवली), अन्दुर्ला, ओरोस बुद्रुक (कुडाळ), रेवंडी, गोठणे (मालवण) या १० निवडक ठिकाणी आधार नुतनीकरण व अद्यतन मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
मागील काही वर्षात अनेक नवनवीन योजना डाक विभागामार्फत राबविल्या जात आहेत. यात बचत बँक, डाक जीवन वीमा योजनांचे संगणकीकरण, इंडीया पोस्ट पेमेंट बँक, आधार सेवा, कॉमन सर्व्हिस सेंटर, महिला सन्मान योजना, आधार इनेबल पेमेंट सर्व्हिस अशा विविध योजना व सुविधा नव्याने राबविल्या जात आहेत. सोबतच ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसच्या सेवा अधिक सुलभ करण्यासाठी नुकतेच जिल्ह्यातील सर्व ३१६ ग्रामीण टपाल कार्यालये दर्पण २.० मध्ये रोल आऊट करण्यात आली असुन, सर्व ग्रामीण टपाल कार्यालये संपूर्णपने ऑनलाईन करण्यात आली आहेत. तसेच डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या या योजनांचा व राष्ट्रीय डाक सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डाक विभागामार्फत करण्यात आले आहे.
