नाशिक, ८ ऑक्टोबर- मराठा समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजे यासाठी झालेला संघर्ष हा आजही कायम आहे. आपण दिलेली मुदत ही सुरू असून सरकारने जर मुदतीत आरक्षणाची घोषणा केली नाही तर तीव्र संघर्ष केला जाईल असा इशारा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा समाजासाठी आंदोलन करणारे जालना येथील अंतरवेली मधील समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत. रविवारी ते नाशिक जिल्ह्यात आले. त्यावेळी त्यांची सायंकाळी सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे विशाल सभा झाली. या सभेला संबोधित करताना मनोज जरंगे पाटील म्हणाले की, समाजाला आरक्षण मिळावे यासाठी म्हणून माझा संघर्ष होता आणि तो संघर्ष मी कायम ठेवलेला आहे. माझे उपोषण सुटले आहे म्हणून माझा संघर्ष संपला असा अर्थ कोणी काढू नये. मला भेटण्यासाठी सरकारची अनेक मान्यवर नेते मंत्री सनदी अधिकारी आले पण मी त्यांना समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे हीच मागणी कायम ठेवली आणि तीच माझी मागणी आजही कायम आहे. त्यांनी माझ्याकडे तीस दिवसाची मुदत मागितली होती. मी त्यांना दहा दिवस जास्त म्हणजे 40 दिवसाची मुदत दिली आहे .या कालावधीमध्ये सरकारने आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय घ्यावा नाहीतर 24 ऑक्टोंबर पासून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशारा देऊन ते म्हणाले की याच्या 14 तारखेला एक महिना पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने अंतरवेली येथे विशाल सभेचे आयोजन केले आहे. या सभेला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
