रामच्या दरबारात एकत्र दिसले सर्वपक्षीय नेते
सरसंघचालक डॉ. भागवतांनीही लावली हजेरी
नागपूर, लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिलेले राजकीय पक्ष रामनवमीच्या निमित्ताने नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरात एकत्र आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विकास ठाकरे हे राजकारणातील विरोधक राम चरणी नतमस्तक होण्यासाठी एकत्र आले होते. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत देखील यावेळी आवर्जुन उपस्थित होते.
नागपुरातील प्रसिद्ध आणि प्राचीन पोद्दारेश्वर राम मंदिरात मतदानाच्या 2 दिवस आधी दोन्ही उमेदवारांनी एकत्र आरती केली. पोद्दारेश्वर राम मंदिराची मिरवणूक निघण्यापूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांनी एकत्र येऊन श्रीरामाची पूजा केली. नागपुरात 19 तारखेला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा आज, बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक प्रचारातून मुक्त झाल्यानंतर हे नेते रामनवमीनिमित्त प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोहोचले. राम मंदिरात मिरवणूक सुरू होण्यापूर्वी प्रार्थना केल्यानंतर नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष देशमुख आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी मिळून मिरवणूक रथाचे नेतृत्व केले. रामाच्या दरबारात राजकीय मतभेद, स्पर्धा सर्व बाजुला ठेऊन आपले मनोरथ आणि आकांक्षा रामावर सोडून सर्वजण भक्तीरसात तल्लीन झाले होते. ऐन निवडणुकीत नेत्यांचे असे एकत्र येणे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
