बुलडाणा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षकांचे जिल्ह्यात आगमन झाले असून कामकाजाला सुरवात झाली आहे. तीनही निवडणूक निरीक्षकांनी विविध ठिकाणी भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेतला.
सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व नोडल अधिकारी यांच्या समवेत आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीसाठी आवश्यक असणारे साहित्य, वाहतूक व्यवस्था, वाहनांची उपलब्धता यांची माहिती घेतली. निवडणूक कामकाजाशी निगडीत निविदा झाल्या आहेत. त्यांच्यासोबत करारही झाले आहेत. त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या सुविधा गरजेनुरूप प्राप्त करून घ्याव्यात. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर तपासणी पथक, व्हीडीओग्राफी पथक पुरेसे आहेत. त्यांच्याकडून प्रभावीपणे काम करून घेण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
निवडणूक कायदा व सुव्यवस्थेसाठी नियुक्त निरीक्षक सेंथिल कृष्णण यांनी आज सुरवातीला माध्यम कक्षाला भेट दिली. कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली. टिव्ही, वृत्तपत्र आणि समाजमाध्यमांवरील निवडणूक विषयक प्रसिद्धीवर बारकाने लक्ष्य ठेवावे. प्रामुख्याने पोर्टलवरील बातम्या या वेगाने वितरीत होत असल्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षातील सी-व्हीजील ॲपवरील तक्रारीबाबत माहिती घेतली. तसेच पथकांचे लोकेशन बाबत माहिती घेतली. त्यानंतर निवडणूक कक्षाला माहिती घेऊन 1950 या हेल्पलाईनची माहिती घेतली. निवडणूक खर्च निरीक्षक यांनी विविध यंत्रणांशी संपर्क साधून खर्चविषयक आढावा घेतला.
