कल्याण, ६ ऑक्टोबर : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरताना दोघे जण खाली कोसळले. फरीद अन्सारी असे मृताचे नाव असून तर रियाज अन्सारी गंभीर जखमी आहे. मृत आणि जखमी दोघेही भाऊ असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुरुवातीला गाडी पकडताना ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नंतर उतरताना हा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
डेक्कन क्वीन एक्स्प्रेस कल्याण स्थानकात थांबत नाही. या स्थानकावर एक्स्प्रेसचा वेग काहीसा कमी होतो. मात्र धावती एक्सप्रेस पकडण्याचा किंवा त्या एक्स्प्रेसमधून उतरण्याचा प्रयत्न असंख्य प्रवासी करतात. त्यात अनेक वेळा दुर्घटना होतात. त्याच गडबडीत पुण्यावरून आलेले दोन भाऊ कल्याण स्थानकात उतरण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी ते दोघेही खाली कोसळले. त्यात एकाचा जीव गेला. दरम्यान या दुर्घटनेनंतर फलाटावरील हमालांनी जखमीला रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकारानंतर रेल्वे स्टेशन परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला. या दुघटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, जीआरपीएफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाय ही सर्व दुर्घटना फलाटावरील सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच ही दुर्घटना घडल्याने कल्याण स्थानकावर फलाट क्रमांक ७ वर एकच गर्दी पाहायला मिळाली. एकीकडे चाकरमान्यांची कामावर जाण्याची धावपळ, दुसरीकडे दुर्घटना त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात काहीसं तणावाचं वातावरण होते. अपघातानंतर गाडी तात्काळ थांबवण्यात आली. दहा मिनिटांनी ती पुढे रवाना करण्यात आली. जीआरपी आणि आरपीएफने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. रेल्वेच्या वेळापत्रकावर या अपघाताचा विशेष परिणाम झाला नाही. मात्र धावत्या गाडीत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
१ जून १९३० मध्ये डेक्कन क्वीन म्हणजेच दख्खनची राणी प्रवाशांसाठी सुरू झाली होती. तेव्हा या रेल्वेचा वापर प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांना मुंबई व पुणे दरम्यान प्रवासासाठी होत असे. सुरुवातीला ही ट्रेन फक्त शनिवार, रविवार प्रवाशांच्या सेवेत असायची. मात्र प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाने ही दररोज चालवली जाऊ लागली.
गाडी कल्याणमध्ये न थांबण्याचे कारण
मुंबईकरांसाठी कल्याण हे स्थानक अतिशय महत्वाचे आहे. कल्याण स्थानक उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे असले तरी डेक्कन क्वीन येथे न थांबण्याची काही खास कारणे आहेत. डेक्कन क्वीन या रेल्वेची सेवा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ती कल्याण नगरपालिकेच्या हद्दीतून धावत होती. याबाबत रेल्वेला कल्याण नगरपालिकेला कर द्यावा लागत असे. मात्र अनेक वर्षे कल्याण नगरपालिकेला हा कर देण्यात आलाच नव्हता. अखेर नगरपालिकेने रेल्वेला न्यायालयात खेचले. न्यायालयात कल्याण नगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर या गाडीचे इंजिन सुद्धा नगरपालिकेने जप्त केले होते. या संपूर्ण प्रकरणानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी जाऊन नगरपालिकेकडे असलेला थकीत कर भरून जप्त केलेले इंजिन सोडवून घेतले. मात्र या संपूर्ण प्रकरणानंतर रेल्वे प्रशासनाने यापुढे कधीही ही गाडी कल्याणला न थांबण्याचा निर्णय घेतला. या खटल्यात कल्याण नगरपालिकेची बाजू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडल्याचे काही संदर्भही आहेत.
