रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी परिसरामध्ये आढळणारे वन्य प्राणी, बिबटे, कोल्हे, ऊदमांजर, घोरपड, यांच्यासह विविध प्रकारचे सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, समुद्राखालील अनोखी जीवसृष्टी, दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती यांच्या अप्रतिम छायाचित्रांचे प्रदर्शन येथे सुरू झाले. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून निसर्ग सोबती, लेन्स आर्ट आणि सह्याद्री संकल्प सोसायटीतर्फे प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आठवडा बाजार येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरच्या नाटेकर सभागृहात तीनशहून अधिक फोटो या प्रदर्शनात झळकले आहेत. प्रदर्शन पाहायला आज शेकडो विद्यार्थी, पालक, नागरिकांनी गर्दी केली. प्रदर्शनाचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील तथा दादा वणजू यांनी केले. यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्ष शिल्पा पानवलकर, डॉ. सचिन पानवलकर, संजय पटवर्धन, सौ. कुलकर्णी, महेश्वरी पाटणे, आगाशे विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, सर्व शिक्षक, लेन्स आर्टचे प्रमुख सिद्धेश वैद्य, निसर्ग सोबतीच्या प्रमुख निखिता शिंदे, नेत्रा आपटे, विवेक सोहोनी, आदी उपस्थित होते.
यावेळी दादा वणजू म्हणाले की, तिन्ही संस्थांनी आपला निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश फोटोतून दाखवला आहे. निसर्गाची विविध रूपे पाहत असताना निसर्गाच्या ऱ्हासाने होणारे नुकसान किती भयानक आहे, याची कल्पना येते. निसर्गाची विविध रूपे पाहण्यासाठी आणि होणारा ऱ्हास टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रदर्शन पाहावे.
रत्नागिरीतील जैवविविधता आणि वन्यजीव या विषयावर लेन्स आर्टच्या फोटोग्राफर्सनी सुरेख फोटो प्रदर्शनात लावले आहेत. हे फोटो टिपण्यासाठी या फोटोग्राफर्सना खूप मेहनत घ्यावी लागली आहे. अक्षय मांडवकर, अर्णव पटवर्धन, अक्षय तोंडवळकर, आशीष शिवलकर, गुरू नांदगावकर, जयकांत पटेल, मंगल राणे, नेत्रा आपटे, निखिल जांभळे, निखिता शिंदे, ओंकार मोघे, प्रसाद गोखले, प्रशांत कानडे, डॉ सचिन पानवलकर, शार्दूल केळकर, डॉ. सृष्टी भार्गव, सिद्धेश वैद्य, सुशील कदम, डॉ उदय वंडकर, उपेंद्र बापट, विराज आठल्ये, वीरश्री रावराणे, विशाल भावे, विवेक सोहोनी, डॉ. रवींद्र गोंधळेकर, प्रतीक मोरे यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत. हे प्रदर्शन ८ ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी १२ ते ५ या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार
