नवी मुंबई, 20 नोव्हेंबर (हिं.स.) – नोकरी, व्यवसायानिमित्त विदर्भातील आपापल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या वैदर्भियांचा खारघर येथे दुसरा कौटुंबिक स्नेहमीलन सोहळा रविवार, २६ नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. ‘आपला विदर्भ सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थे’तर्फे आयोजित या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसह सर्व सदस्यांसाठी परिचय सत्रही आयोजित करण्यात आले आहे.
खारघर येथील सेक्टर ३५ ई मधील साईलीला बँक्वेट सभागृहात २६ नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे. मुंबई व लगतच्या परिसरात राहणा-या वैदर्भियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या सोहळ्याला लाभणार आहे.
श्याम पेठकरांची ‘टिप्पारणी’
या कार्यक्रमात प्रसिध्द लेखक, कांदबरीकार, नाटककार श्याम पेठकर यांच्या ‘टिप्पारणी’ या व-हाडी भाषेतील लोकप्रिय विनोदी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मूळ विदर्भातील असलेले श्याम पेठकर यांच्या रगतपिती, तेरवं, दाभोळकरचे भूत या नाट्यकृती देशभर गाजल्या असून ऋतूस्पर्श, गावझुला, भावलीचे लगीन या त्यांच्या साहित्यकृती समीक्षक आणि वाचक यांच्यात लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळाले असून २०२० च्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
नाळ २ चित्रपटातील अभिनेत्री किरण शरद यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. किरण या मूळ विदर्भातील असून नाळ २ या चित्रपटात त्यांनी नागराज मंजुळे यांच्या बहिणीची भूमिका केली आहे. डान्स इंडिया डान्स या नृत्यावर आधारित स्पर्धाही त्यांनी प्रथम क्रमांकांनी जिंकली आहे.यावेळी संस्थेच्या सदस्यांव्दाराही विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.
“मुंबई, नवी मुंबई व लगतच्या परिसरात राहणा-या वैदर्भियांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावण्यासाठी, त्यांना हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी आपला विदर्भ संस्थेची स्थापना झाली आहे. वैदर्भियांसाठी कुटुंबापासून दूर हक्काचे कुटुंब म्हणजे आपला विदर्भ संस्था असून या स्नेहमीलन सोहळ्यास अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे”, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एड. विजयकुमार कोहाड आणि सरचिटणीस प्रमोद चुंचूवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विजयकुमार कोहाड – ९९६९२ ३८१५० आणि अनंत शिंदे – ७५०६८३७५१० यांना सपर्क करावा, असे आवाहन आपला विदर्भ संस्थेने केले आहे.
हिंदुस्थान समाचार
