चंद्रपूर 6 ऑक्टोबर (हिं.स.) – चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात वाघाचा मुक्त संचार पुन्हा एकदा दिसून आला आहे. गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता कॉलनी परिसरात फिरणाऱ्या या वाघाचा व्हिडिओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला.
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन लगत चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आहे. या वीज केंद्र परिसरात वाघ आणि बिबट्याचे वास्तव्य आहे. वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यात येथे अनेकांचा बळीही गेला आहे. त्यानंतर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत पोस्टर, बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती. तसेच वीज केंद्र परिसरातील झुडपी जंगल देखील साफ करण्यात आले होते. मात्र गुरुवारी पुन्हा एकदा वीज केंद्र परिसरात पट्टेदार वाघ दिसून आला आहे. हा वाघ रस्ता ओलांडून प्रकल्पाच्या दिशेने जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्याच वेळी एक मोटारसायकल स्वार आणि कार चालक तिथून जात आहे. यातील कार चालकाने हा व्हिडिओ चित्रित केला आहे. तेव्हा वीज केंद्र परिसरातून रात्री, बेरात्री जाताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
