पुणे 7ऑक्टोबर (हिं.स) मेट्रो आणि उड्डाण पुलाच्या कामामुळे आनंद ऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) आणि गणेशखिंड रस्त्यावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यापीठ चौक ते महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद संस्था असा पर्यायी मार्ग तयार केला जाणार आहे. यासाठी परिषदेने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच मॉडर्न शिक्षण संस्थेने केवळ दुचाकी वाहतुकीसाठी परवानगी द्यावी, याबाबत चर्चा केली जाईल, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह गणेशखिंड, बाणेर आणि औंध रस्त्याची पाहणी करून येथील कामांचा आढावा घेतला. औंधकडून शिवाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुचाकी, चारचाकी वाहने पुणे विद्यापीठ चौकात न येता ती विद्यापीठाच्या आवारातून पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहेत.
हिंदुस्थान समाचार
