एम. फातिमा बीवी 96 व्या वर्षी कालवश
बेंगळुरू, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : भारतीय सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे आज, गुरुवारी वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 96 वर्षांच्या होत्या.
न्या. फातिमा बीवी यांचा जन्म १९२७ मध्ये केरळमध्ये झाला होता. केरळमधील पंडालम येथील असलेल्या न्यायमूर्ती बीवी यांचे शालेय शिक्षण हे पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूलमध्ये झाले होते. त्यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. एम.फातिमा बीवी यांनी 1950 मध्ये बार काऊन्सिलच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच, त्या बार काऊन्सिल गोल्ड मेडल मिळवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यानंतर त्यांनी केरळमध्ये वकील म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. कायद्याच्या गाढ्या अभ्यासक असलेल्या एम. फातिमा बीवी 1983 मध्ये उच्च न्यायालय आणि 1989मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बनल्या. आशियाई देशात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या.
फातिमा बीवी 1993 मध्ये निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणूनही काम केले. त्यांना 1990 मध्ये डी.लिट पुरस्काराने गौरवण्यात आले होते. तसेच, भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस- इंडिया बिझनेस कौन्सिल (युएसआयबीसी) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
हिंदुस्थान समाचार
