रत्नागिरी, 17 ऑक्टोबर (हिं.स.) : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्याच्या दौर्यावर असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर आज, मंगळवारी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान भरकटले. त्यामुळे या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. त्याचवेळी त्या आरक्षणातले अडथळे नेमके कोण, हे प्रत्येक भाषणात ते सांगत आहेत. शरद पवारांनी वेगवेगळ्या समाजांना आरक्षणाच्या नावाखाली कसे झुलवत ठेवले, याचे सविस्तर वर्णन पडळकर आपल्या भाषणात करत आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून मंगळवारी पडळकर रत्नागिरी दौऱ्यावर होते. तेथे खेडमध्ये त्यांची सभा होती, पण दरम्यानच्या काळात तिथे वादळ सुरू झाले आणि हेलिकॉप्टर पुढे चालेनासे झाले. त्यामुळे पायलटला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. मात्र, खेड मधली पडळकर यांची सभा झाली. या सभेतही पडळकर यांनी पवार कुटुंबावरच निशाणा साधला.
हेलिकॉप्टर भरकटलेले गोपीचंद पडळकर हे एकच नेते नाहीत. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तीन-चार वेळा त्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याच्या घटना घडल्या, पण ते सुरक्षित राहिले. आता गोपीचंद पडळकर यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची बातमी आल्याने समर्थकांमध्ये धास्ती निर्माण झाली. पण पडळकर सुरक्षित आहेत आणि ते त्यांचा धनगर आरक्षण दौरा पुढे नेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.
हिंदुस्थान समाचार
