महापालिकेतील नोकरी घोटाळा प्रकरणी कारवाई
कोलकाता, 12 जानेवारी (हिं.स.) : पश्चिम बंगालमधील महापालिकेतील नोकरी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज, शुक्रवारी राज्य सरकारमधील 2 मंत्र्यांच्या घरी छापा टाकला. अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस आणि तपस रॉय यांच्या निवासस्थानी पहाटेच्या वेळी ईडीचे पथक धडकले. यासोबतच महापालिकेच्या माजी उपाध्यक्षांकडे देखील ईडीची धाड सुरू आहे.
गेल्या 5 जानेवारी रोजी रेशन घोटाळ्याप्रकरणी टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक गेले होते, यावेळी गावकऱ्यांच्या जमावाने ईडी पथकावर हल्ला केला. जमावाने ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफ जवानांच्या वाहनांनाही लक्ष्य केले होते. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर तपास संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल नवीन कोलकाता येथे पोहोचले होते. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना घाबरू नका, निर्भयपणे चौकशी करा, असे सांगितले होते. ईडी अधिकार्यांशी बैठक घेतल्यानंतर प्रभारी संचालकांनी सीएपीएफ दलाच्या सुरक्षा कर्मचार्यांशी समन्वय बैठक घेतली. बैठकीत, छाप्यांदरम्यान ईडी अधिकार्यांसह सीएपीएफच्या तैनातीची योजना तयार करण्यात आली. अधिकार्यांसोबतच महिला पोलिसांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून अडथळे निर्माण करणार्या महिलांना दूर करता येईल, असे मत कार्यकारी संचालक राहुल नवीन यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार राज्यात ईडी पुन्हा एकदा सक्रीय झाली असल्याचे चित्र आहे.
हिंदुस्थान समाचार
