मणिपूरच्या खोंगजोम येथून सुरू होणार यात्रा
इम्फाल, 11 जानेवारी (हिं.स.) : मणिपूरच्या इम्फाल येथून सुरू होणाऱ्या भारत जोडो यात्रेला सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे आता भारत जोडो न्याय यात्रेचा स्टार्टिंग पॉईंट बदलण्यात आलाय. आता ही यात्रा आगामी 14 जानेवारी रोजी राजधानी इम्फाल ऐवजी मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील खोंगजोम येथून सुरू होणार आहे. मणिपूर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के. मेघचंद्र यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात के. मेघचंद्र यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाने भारत जोडो-न्याय यात्रेचे ठिकाण बदलले आहे. ही यात्रा आता इम्फाल ऐवजी थौबल जिल्ह्यातील खोंगजोम येथून काढण्यात येणार आहेत. इम्फाल येथून ही यात्रा सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. यामुळे जुने ठिकाण बदलण्यात आले आहे. त्याऐवजी आता ही यात्रा नव्या ठिकाणाहून सुरू होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे 14 जानेवारी रोजी भारत जोडो न्याय यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. ही न्याय यात्रा 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. काँग्रेसने यापूर्वी राज्य सरकारकडे इम्फालमधील पॅलेस मैदानावरून ही यात्रा सुरू करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, राज्य सरकारने कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्यातील परिस्थितीचा हवाला देत येथून ही यात्रा सुरू करण्यास नकार दिला होता.
हिंदुस्थान समाचार
